आली रे आली... भारतातील पहिल्या डेंग्यू लसीला मंजुरी... इतके डोस घ्यावे लागणार...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २२ जुलै - डेंग्यू आजाराच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी भारताने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने’ (CDSCO) देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला मंजुरी दिली आहे. 'डेंग्यू टेट्राव्हॅलंट व्हॅक्सीन – Qdenga®' असे या लसीचे नाव असून या निर्णयामुळे राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे.

ही लस जर्मनीतील ताकेडा जीएमबीएच (Takeda GmbH) कंपनीद्वारे उत्पादित केली जात असून, 'मेसर्स ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे ती भारतात आयात केली जाणार आहे.

कशी आहे ही लस आणि डोसचे स्वरूप?

वय आणि डोस: ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार ०.५ मिलीचे दोन डोस ३ महिन्यांच्या अंतराने त्वचेखाली (Subcutaneously) टोचले जातील.

तंत्रज्ञान: ‘Qdenga®’ ही रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली जिवंत, पण सौम्य केलेली (Live Attenuated) टेट्राव्हॅलंट लस आहे. ही लस शुष्क भुकटीच्या (Freeze-dried powder) स्वरूपात उपलब्ध असेल.

कडक चाचण्या: औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचे सर्वसमावेशक वैज्ञानिक मूल्यमापन केल्यानंतरच ही मंजुरी देण्यात आली आहे.

Advertisement

जागतिक दर्जा आणि ४२ देशांचा विश्वास

या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह ४२ देशांमध्ये आधीच मंजुरी मिळालेली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) पूर्वपात्रता देखील या लसीला प्राप्त आहे.

जागतिक स्तरावर या लसीचे २.४ कोटींहून अधिक डोस आधीच वितरित करण्यात आले असून, ब्राझील, थायलंड, श्रीलंकेसह भारतातील ४ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांवर घेण्यात आलेल्या टप्पा-३ च्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध झाली आहे.

सार्वजनिक आरोग्याला मिळणार नवे बळ

भारतामध्ये राष्ट्रीय हिवताप व कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डास नियंत्रण, लवकर निदान आणि रुग्ण व्यवस्थापन केले जाते. आता या पहिल्या डेंग्यू लसीच्या उपलब्धतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकारला मोठे यश मिळणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.