आंदोलक राहुल गांधींसोबत पोलिसांची झटापट... प्रियांका आणि अखिलेश यादवांसह दिग्गज नेत्यांना अटक... नेमकं काय घडलं?

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २१ जुलै - नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि सोमवारी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जनंतर देशाची राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मंगळवारी सायंकाळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अचानक दिल्लीतील '७, लोक कल्याण मार्ग' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर धडक देत तासनतास ठिय्या आंदोलन सुरू केले.

​अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची आणि सरकारची मोठी भंबेरी उडाली. सुमारे ३ ते ४ तास चाललेल्या या नाट्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेऊन मॉडेल टाऊन पोलीस ठाण्यात नेले.

​अन् खर्गेंच्या वाढदिवसाच्या सोहळ्यानंतर अचानक 'मिशन पीएम हाऊस'!

​काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी वरिष्ठ नेते आणि खासदारांना घेऊन १०, राजाजी मार्गावर गेले होते. हा कार्यक्रम संपताच राहुल गांधी यांच्या ताफ्यामागे राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या. ताफा थेट पंतप्रधान निवासाबाहेर पोहोचला आणि तेथे पोहोचताच आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

​द इंडियन एक्सप्रेसनुसार, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांनी अत्यंत गोपनीयतेने या आंदोलनाची आखणी केली होती, ज्यामुळे काँग्रेसच्या २५ हून अधिक खासदारांनाही याचा अचानक धक्का बसला.

​जमिनीवर झोपले, पोलिसांशी झटापट अन् राहुल गांधी जखमी

​ठिय्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी हाताला पट्ट्या बांधून "आम्हालाही अटक करा" असा नारा दिला. रात्री पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधी जमिनीवर झोपले.

Advertisement

​काँग्रेसचा आरोप: पोलिसांनी राहुल गांधींना बळजबरीने उचलून बसमध्ये टाळण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत राहुल गांधी यांना किरकोळ दुखापत झाली.

​व्हिडिओ व्हायरल: चोहोबाजूंनी पोलिसांनी राहुल गांधींना उचलल्याचा व्हिडिओ काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत, "पाहा मोदींची हुकूमशाही! देशातील विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे वागवले जात आहे," अशी जोरदार टीका केली.

​केंद्रीय मंत्र्यांचे मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ

​केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन दोन ते तीन वेळा राहुल गांधींशी चर्चा केली. उद्या लोकसभेत NEET च्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने मान्य केले होते, मात्र तरीही राहुल गांधींनी आंदोलन मागे न घेता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी मागणी पुढे केली, असा दावा डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला. विरोधी पक्षनेत्याने दिलेल्या शब्दावरून मागे फिरणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

​विरोधी पक्षांची एकजूट

​या आंदोलनात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज खासदार सहभागी झाले होते. दुसरीकडे, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी जंतर-मंतर येथे जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींमुळे केंद्र सरकारवर चौफेर दबाव वाढला असून पुढील कायदेशीर आणि राजकीय प्रक्रियेकडे देशाचे लक्ष लागले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.