नाशिकमध्ये चॉपर आणि कोयत्याचा थरार... गुन्हेगारांचे पोलिसांना उघड आव्हान...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जुलै - शहर आणि परिसरात किरकोळ कारणांवरून जीवघेणे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, गुन्हेगारांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्त्यात वाहने लावल्याच्या रागातून एका गॅरेज मालकावर चॉपरने वार करण्यात आल्याची घटना अमरधाम भागात घडली, तर दुसऱ्या घटनेत सिगारेट दिली नाही म्हणून किराणा दुकानदारावर कोयत्याने हल्ला करून रोकड लुटल्याचा प्रकार सामनगाव रोड परिसरात घडला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात अनुक्रमे जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना: रस्त्यात वाहने लावल्यावरून गॅरेज मालकावर चॉपरने वार

अमरधामसमोरील टाळकुटेश्वर भागात घडलेल्या पहिल्या घटनेत गॅरेज मालक जखमी झाला आहे. याप्रकरणी राहुल उर्फ चुडी राठोड (रा. काझीगडी, अमरधाम रोड) या संशयिताविरोधात भद्रकाली पोलिसांत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत सचिन रमेश बेलदार (रा. तुळजाभवानीनगर, नांदूरनाका) यांनी फिर्याद दिली आहे. बेलदार यांचे टाळकुटेश्वर भागात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. सोमवारी ते ग्राहकाचे वाहन दुरुस्त करत असताना, परिचित असलेल्या संशयित राहुल याने "तू रस्त्यात गाड्या लावतो," असे म्हणून वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कमरेचा चॉपर काढून बेलदार यांच्या कपाळावर वार करून तो पसार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे करत आहेत.

दुसरी घटना: सिगारेट नाकारल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला, रोकड लुटली

दुसरी घटना सामनगाव रोड परिसरात घडली असून, सिगारेट दिली नाही या क्षुल्लक रागातून दुचाकीस्वाराने किराणा दुकानदारावर कोयत्याने वार करत त्याला लुटले. याप्रकरणी किरण चंदू चव्हाण (रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड) या संशयिताविरुद्ध नाशिक रोड पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अजय बाळू निळे (रा. तानाजीनगर, सामनगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे. निळे रविवारी रात्री आपले किराणा दुकान बंद करून घराकडे पायी जात असताना, कांगणे दुकानाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या किरण चव्हाण याने "तुला जास्त माज आला आहे का? तू मला सिगारेट देण्यास का नाही म्हणालास?" असे म्हणत धारदार कोयत्याने निळे यांच्या बरगडीवर व पाठीवर वार केले. निळे जखमी होऊन खाली कोसळताच संशयिताने त्यांच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. "पोलीस ठाण्यात गेलास तर तुझा बेत पाहतो," अशी धमकी देऊन भामटा पसार झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.