नाशिक, (प्रतिनिधी) ८ नोव्हेंबर - अनेक वर्षांपासून स्वतःच्या मालकीच्या जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील अत्यंत गरजू व भूमिहीन कुटुंबांसाठी याेग्य दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, सिन्नर आणि येवला या चार प्रमुख तालुक्यांमधील तब्बल २०७ पात्र भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जमिनी विनामूल्य मंजूर करण्याचे अधिकृत आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे अनेक पिढ्यांपासून हक्काच्या निवाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जमिनीअभावी रखडलेली घरकुले अन् प्रशासनाचा संवेदनशील निर्णय
स्वतःची हक्काची जागा नसल्यामुळे अनेक गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना लहान-लहान झोपड्यांमध्ये, शासकीय किंवा खासगी जमिनीवर अतिक्रमण करून किंवा इतरांच्या जमिनीवर आश्रय शोधावा लागत होता. प्रशासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मंजूर होऊन कागदोपत्री घर मिळत असले, तरी प्रत्यक्षात स्वतःची जागा नसल्यामुळे अनेकांना घर बांधता येत नव्हते आणि त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहत होती.
सामान्य नागरिकांची हीच मोठी अडचण ओळखून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समन्वयातून विशेष आणि तत्पर प्रयत्न केले. सर्व आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून एकाच आदेशाद्वारे २०७ कुटुंबांसाठी शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
चारही तालुक्यांतील लाभार्थी कुटुंबांची आकडेवारी
जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील गावनिहाय भूमिहीन कुटुंबांना या जमिनी वाटप करण्यात येणार आहेत, ज्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे:
* बागलाण तालुका (सर्वाधिक ९४ कुटुंब): या तालुक्यातील सहा गावांमधील एकूण ९४ कुटुंबांना लाभ मिळणार आहे. यात मौजे सरवर (गट क्र. १) मधील ५, मौजे आंबासन (गट क्र. १४) मधील १३, मौजे राजपुरपांडे (गट क्र. १२२) मधील १३, मौजे साकोडे (गट क्र. ११४/९) मधील ४२, मौजे मळगाव/तिळवण (गट क्र. १३) मधील २ आणि मौजे वाडीपिसोळ (गट क्र. ५९) येथील १९ कुटुंबांचा समावेश आहे.
* मालेगाव तालुका (७८ कुटुंब): मालेगाव तालुक्यातील चार गावांमधील ७८ कुटुंबांसाठी जमिनी मंजूर झाल्या आहेत. यात मौजे देवघट (गट क्र. १५७ व १८६) येथील ११, मौजे तिळवण (गट क्र. ८५) येथील ७, मौजे वऱ्हाणे (गट क्र. ३०८) येथील ४ आणि मौजे झोडगे (गट क्र. ४७२ व ८८३/२/अ) येथील ५६ कुटुंबांना लाभ मिळेल.
* सिन्नर व येवला तालुका: सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखिंड येथे 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' (पीएम जनमन) अंतर्गत १० कुटुंबांना (गट क्र. १३४), तर येवला तालुक्यातील मौजे मुखेड येथील २५ कुटुंबांना (गट क्र. १११३/३) घरकुलासाठी शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींकडे जमिनी वर्ग व कडक निकष
मंजूर करण्यात आलेल्या या सर्व जमिनींचे भूखंड संबंधित स्थानिक ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आले आहेत. नियमानुसार निवासी अभिन्यास (Layout) मंजूर करून सर्व पात्र लाभार्थ्यांना भाडेपट्ट्याने अथवा प्रचलित धोरणानुसार जमिनीचे कायदेशीर वितरण करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी, संबंधित लाभार्थ्यांच्या नावावर यापूर्वी कुठलेही पक्के घर किंवा भूखंड नसल्याची खातरजमा करूनच प्रत्यक्ष ताबा देण्याचे सक्त निर्देश संबंधित सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
केवळ कागदावर घरकुल मंजूर करून न थांबता, घर बांधण्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरणारी 'जागा' उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयामुळे २०७ कुटुंबांच्या आयुष्यात सुरक्षित निवाऱ्याची आणि आनंदाची नवी पहाट उजाडली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात जिल्हा प्रशासनाचा हा संवेदनशील निर्णय संबंधित कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाची पर्वणी ठरला आहे.