नाशिक, (प्रतिनिधी) ८ नोव्हेंबर - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ऐतिहासिक जन्मभूमी असलेल्या भगूर शहराच्या विकासाला आता आधुनिकतेची व पर्यावरणपूरकतेची जोड मिळणार आहे. भगूर नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-व्हेईकल) अद्ययावत चार्जिंग स्टेशन उभारण्यासोबतच महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम आणि पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक व्ह्यू पॉइंट व सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत. या विविध नागरी विकासकामांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एकूण ९९ लाख ९९ हजार ८१६ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावाला ही मंजुरी मिळाली असून, यासाठी लोकप्रतिनिधींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनमधून पालिकेला नियमित उत्पन्न
भगूर नगरपरिषदेच्या नगरभूमापन क्रमांक ९८१ मधील मोकळ्या जागेवर ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. शहरात येणाऱ्या आणि स्थानिक ई-दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही उत्तम सुविधा उपलब्ध होईल. वाहनधारकांकडून नियमानुसार चार्जिंग शुल्क आकारले जाणार असून, या माध्यमातून नगरपरिषदेला स्वतःच्या मालमत्तेतून नियमित उत्पन्नाची एक नवी संधी उपलब्ध होणार आहे.
सावरकरांच्या जन्मभूमीला भेट देणारे हजारो पर्यटक, तसेच नाशिक, देवळाली व लगतच्या परिसरातील नागरिकांना या चार्जिंग स्टेशनचा मोठा फायदा होईल. राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ नुसार २०३० पर्यंत एकूण नवीन वाहन नोंदणीमध्ये ई-वाहनांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर भगूरमधील हा उपक्रम पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणारा आणि स्थानिक पातळीवर ई-वाहनांचा वापर वाढवणारा ठरणार आहे.
महिलांसाठी कौशल्य विकास व हिरकणी केंद्र
सार्वजनिक आरोग्य व महिला कल्याणाच्या सुविधांसाठी ४९ लाख ३१ हजार ३६७ रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. नगरभूमापन क्रमांक २३४/२ मधील जागेत महिला कौशल्य विकास केंद्र, हिरकणी केंद्र आणि आधुनिक सार्वजनिक शौचालय उभारले जाईल.
या केंद्रामुळे स्थानिक महिलांना रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळेल, तर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र व सुरक्षित हिरकणी केंद्र उपलब्ध होणार आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध होण्यासोबतच मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा येथे विकसित केल्या जाणार आहेत.
प्रमुख चौकांमध्ये वॉटर एटीएम अन् पर्यटनाला नवा साज
शहरातील नागरिक व पर्यटकांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या दत्तमंदिर चौक आणि शिवाजी चौक येथे 'वॉटर एटीएम' कार्यान्वित केले जाणार आहेत.
याशिवाय, पर्यावरण व पर्यटनविषयक कामांसाठी ५० लाख ६८ हजार ४४ञ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून क्रांतीचौक, भगूर येथे नयनरम्य व्ह्यू पॉइंट आणि सेल्फी पॉइंट उभारला जाणार आहे. वीर सावरकरांच्या ऐतिहासिक स्मृतींशी जोडलेल्या या परिसरात आकर्षक पर्यटन सुविधा निर्माण झाल्यामुळे भगूरच्या पर्यटन ओळखीला नवी दिशा प्राप्त होणार आहे.
विशेष अनुदानातून भगूरचा कायापालट
ही सर्व विकासकामे 'वैशिष्ट्यपूर्ण' कामांसाठी विशेष अनुदान तसेच 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना'अंतर्गत केली जाणार आहेत. भगूर नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार ही मान्यता देण्यात आली असून नगरपरिषद ही या कामांची मुख्य कार्यान्वयन यंत्रणा असणार आहे.
इलेक्ट्रिक वाहन सुविधा, महिला सबलीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पर्यटन विकास अशा सर्वसमावेशक योजनांमुळे भगूर शहराच्या नागरी विकासाला नवी गती मिळणार असून, ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक शहराकडे भगूरची वाटचाल सुरू झाली आहे.