नाशिक, (प्रतिनिधी) ८ नोव्हेंबर - आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सणाच्या काळात जिल्ह्यातील फटाके विक्रेते तसेच नागरिकांनी शासनाने व न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असलेल्या घातक फटाक्यांची विक्री व वापर करू नये, तसेच फटाके वाजवण्यासाठी केवळ सायंकाळी ७ ते रात्री १० हीच वेळ निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.
घातक घटक आणि जास्त आवाजाच्या फटाक्यांवर कडक बंदी
भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार १२५ डीबी (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथियम, आर्सेनिक, लीड आणि मर्क्युरी यांसारखे विषारी घटक असलेल्या फटाक्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या घातक रसायनांमुळे वातावरणात विषारी वायू पसरून प्राणी, पक्षी, वनस्पती तसेच मानवी आरोग्यावर विशेषतः लहान मुले व वृद्धांवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू प्रदूषणाचा स्तर कमालीचा वाढतो, ही बाब लक्षात घेऊनच ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.
प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि पोलिसांना सूचना
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फटाका विक्रेत्यांनी स्फोटक अधिनियम १८८४ आणि स्फोटक नियम २००८ मधील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय हरित लवाद (NGT), नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करणे प्रत्येकाला आवश्यक आहे.
या मोहिमेत शैक्षणिक संस्थांनी पुढे येऊन फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रबोधन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने या सर्व आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, तर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून नियमांचे पालन होत असल्याची पडताळणी करावी आणि आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरू
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी आणि पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव' येथे एक विशेष नियंत्रण कक्ष (Control Room) सुरू करण्यात आला आहे.
नागरिकांना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास त्यांनी तात्काळ ०२५७-२२२१२८८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा srojalgaon@mpcb.gov.in या ई-मेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
'हरित दिवाळी' साजरी करण्याचे आवाहन
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा. मातीचे दिवे व पणत्या उजळाव्यात, प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागदी किंवा कापडी आकाशकंदील लावावेत. खरेदीसाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा. झाडांवर कृत्रिम विद्युत रोषणाई करून त्यांना इजा पोहोचवू नये, तसेच टाकाऊ व पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर करावा. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त 'हरित दिवाळी' साजरी करावी, असे आग्रही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.