नाशिक रिंगरोड भूसंपादन... या गावातील खरेदी प्रक्रिया पूर्ण...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २२ जुलै - नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा-२०२७’ च्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ‘परिक्रमा मार्ग’ (रिंग रोड) प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून दिंडोरी तालुक्यातील मौजे मानोरी येथील शैक्षणिक संस्थेची जागा थेट खरेदीद्वारे (Direct Purchase) संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेची जागा संपादित

प्रस्तावित परिक्रमा मार्गात येणारी मौजे मानोरी येथील गट क्रमांक १२३ मधील ‘क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक’ यांच्या मालकीची ०.७८ हेक्टर आर (सुमारे पावणेदोन एकर) जमीन थेट खरेदीद्वारे यशस्वीरित्या संपादित करण्यात आली आहे.

धर्मादाय सहआयुक्तांची परवानगी: संबंधित जमीन शैक्षणिक संस्थेच्या मालकीची असल्याने कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून धर्मादाय सहआयुक्त (नाशिक विभाग) यांच्याकडून रीतसर परवानगी प्राप्त करण्यात आली.

Advertisement

संस्थेचे सहकार्य: धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरीनंतर सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष श्री. कोंडाजी रावबा आव्हाड आणि सरचिटणीस श्री. हेमंत हरीभाऊ धात्रक यांनी विशेष सहकार्य केले.

जमीन खरेदीची ही प्रक्रिया पूर्ण करताना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (MSIDC) कार्यकारी अभियंता श्री. संदीप पांडागळे हे देखील उपस्थित होते.

परिक्रमा मार्गाला मिळणार वेग

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान नाशिक शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या आणि वाहनांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी हा परिक्रमा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गासाठी वेगाने होत असलेल्या भूसंपादनामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच गती मिळणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.