जंतर मंतर येथे आज घडल्या या नाट्यमय घडामोडी... संपूर्ण देशाचे लागले लक्ष...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २१ जुलै - देशाची राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांनी पेटून निघाली आहे. एका बाजूला पेपरफुटी आणि शैक्षणिक मुद्द्यांवरून 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर तीव्र निदर्शने सुरू केली आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारत-अमेरिका प्रस्तावित 'मुक्त व्यापार करारा'विरोधात (India-US Trade Deal) दिल्लीत धडकणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन; शरद पवारांची भेट

सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर जंतर मंतरवरील वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जंतर मंतरवर जाऊन आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला.

आंदोलकांची नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी शरद पवारांशी बोलताना आपल्या ४ प्रमुख मागण्या मांडल्या:

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

दिल्ली आणि मुंबईतील विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे व देशातील एफआयआर मागे घ्यावेत.

आत्महत्या केलेल्या पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत मिळावी.

डिटेन करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका करावी.

Advertisement

या आंदोलनाला विरोधी पक्षांचा मोठा पाठिंबा मिळत असून, मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. मंगळवारी खासदार संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली होती. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासाबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

किसान घाटाकडे जाणाऱ्या ५,००० हून अधिक शेतकऱ्यांची धरपकड

'देश बचाओ मोर्चा'च्या बॅनरखाली देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटना भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात आक्रमक झाल्या आहेत. किसान घाट येथे आंदोलन करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल होत असताना पोलिसांनी नाकेबंदी करत तीव्र दडपशाही सुरू केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह सुमारे ५,००० हून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाब-हरियाणाची मुख्य शंभू व खनौरी बॉर्डर सील करण्यात आली असून अंबाला परिसरात कलम १६३ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे.

सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास न्यायालयाची परवानगी

'नीट' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेली ही दडपशाही असल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले की, वांगचुक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारची हरकत नाही, मात्र डिस्चार्जचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्हावा. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत दिल्ली उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांना मेडांता रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.