मनोहर शिंदे, (नाशिक) २२ जुलै - नाशिक शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, बदलते औद्योगिकीकरण आणि भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून नाशिक महानगरपालिका व ‘महा-मेट्रो’ यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०५६ पर्यंतचा ‘सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा’ (Comprehensive Mobility Plan - CMP) तयार करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या प्रमुखांसमोर या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
हा आराखडा अंतिम करून सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यापूर्वी पुढील ७ दिवसांत सर्व संबंधित विभागांना त्यांच्या सूचना व शिफारशी लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन महा-मेट्रोने केले आहे.
५८ किलोमीटरचे तीन प्रमुख 'मेट्रो/MRTS' मार्ग
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुमारे ५८ किलोमीटर लांबीच्या 'मास रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम' (MRTS) जाळ्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वे ३ मार्गिकांचा समावेश आहे:
गंगापूर ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन: २१.५० किमी
गंगापूर-मुंबई नाका ते पाथर्डी फाटा: १३.५८ किमी
ओझर विमानतळ मार्ग-मुंबई नाका/पाथर्डी फाटा ते अंबड: सुमारे २३ किमी
आराखड्यातील इतर प्रमुख वैशिष्ट्ये:
रस्ते विकास व मिसिंग लिंक्स: शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड उभारणे, रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' जोडणे आणि प्रमुख चौकांची सुधारणा करणे.
पादचारी व सायकलस्वारांना प्राधान्य: शहरात १३१ किमीचे पादचारी मार्ग (फूटपाथ) आणि ८८ किमीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक प्रस्तावित आहेत. गोदावरी नदीकाठ परिसरातही विशेष पादचारी व सायकल मार्ग विकसित केले जातील.
सिंहस्थ कुंभमेळा विशेष नियोजन: दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी पार्किंग, होल्डिंग एरिया, गर्दीच्या ठिकाणी सुलभ संपर्क व्यवस्था आणि बहुविध वाहतूक केंद्र (Multimodal Integration Hubs) उभारले जातील. या सुविधांचा फायदा शहराला कायमस्वरूपी होईल, असे नियोजन आहे.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सूचना
गंगापूर रोड ते नाशिक रोड मार्ग: या मुख्य मार्गाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांवरील वाहतुकीचाही विचार आराखड्यात व्हावा, अशी सूचना आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केली.
एकात्मिक विकास: सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, यासाठी महा-मेट्रोने राज्य पातळीवरून सर्व विभागांना या आराखड्याबाबत अवगत करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
उपस्थित मान्यवर:
बैठकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, महापौर डॉ. हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.