सुरक्षितता, स्वच्छता व निर्माल्य संकलनाचे योग्य नियोजन करा.... माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सूचना.... गणेश विसर्जनासाठी घाटाची पाहणी

Share:
Main Image
Last updated: 05-Sep-2026

येवला, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - येवला शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी येवला शहरातील अहिल्यादेवी होळकर घाटाची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली. गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षितता, स्वच्छता तसेच विसर्जन प्रक्रियेचे सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  दिल्या.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी घाट परिसराची पाहणी करून विसर्जनाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार अथवा अपघात होणार नाही, यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

गणेश विसर्जनाच्या वेळी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सांगताना समीर भुजबळ म्हणाले की, “गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक घाटावर येतात. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन आधीच पूर्ण करावे.” घाट परिसरातील स्वच्छतेबाबतही त्यांनी विशेष सूचना केल्या. विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने घाट परिसरात स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. निर्माल्य, प्लास्टिक व इतर पूजासाहित्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी योग्य ठिकाणी व्यवस्था करावी, जेणेकरून नदी व जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच घाट परिसरात प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे नियमन, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग, आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक यंत्रणा आणि भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबतही योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

“गणेश विसर्जनाचा सोहळा भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखला गेला पाहिजे. प्रशासन, नगरपालिका, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम केल्यास विसर्जन प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडेल,” असे समीर भुजबळ यांनी सांगितले.

गणेश मंडळांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून विसर्जनाच्या वेळी शिस्त व संयम राखावा, भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संभाजी पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दीपक लोणारी, मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, नगरसेवक गोटू मांजरे, सुनील पैठणकर, भूषण लाघवे, ॲड. मंगेश भगत, कांतिलाल साळवे, बबनराव साळवे, सचिन सोनवणे, पार्थ कासार, महेश गादेकर, आदित्य कानडे, दीपक पवार, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet.