जळगावच्या जवानाला युद्धभ्यासादरम्यान वीरमरण... शासकीय इतमामात अखेरचा निरोप...

Share:
Main Image
Last updated: 05-Sep-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील १ पॅरा (स्पेशल फोर्सेस) युनिटचे वीर जवान लान्स नायक रोहित नारायण पाटील यांच्या पार्थिवावर कोळपिंप्री येथे साश्रुनयनांनी आणि पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या व पोलीस दलाच्या तुकडीने हवेत फैरी झाडून वीर जवानाला अखेरची मानवंदना दिली.

युद्धभ्यासादरम्यान आले वीरमरण

भारतीय सैन्य दलातील १ पॅरा (SF) मध्ये कार्यरत असलेले सैनिक लान्स नायक (GD) रोहित नारायण पाटील हे १ सप्टेंबर २०२६ रोजी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनी कुंड बॅरेज परिसरात सुरू असलेल्या सैन्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत युद्धाभ्यासात सहभागी झाले होते. चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पाण्याखालील डायव्हिंग आणि हेलोकास्टिंगचा सराव सुरू असताना त्यांना वीरमरण आले.

गावात शोककळा; ग्रामस्थांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लष्करी वाहनातून शहीद रोहित पाटील यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कोळपिंप्री (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे आणण्यात आले. पार्थिव गावात पोहोचताच कुटुंबीय, नातेवाईक आणि पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. "अमर रहे, अमर रहे, शहीद जवान अमर रहे" आणि "भारत माता की जय" च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

प्रशासकीय व राजकीय नेतृत्वाकडून पुष्पचक्र अर्पण

राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शहीद लान्स नायक रोहित पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी शहीद जवानाच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वस्त केले.

अंत्यसंस्कार प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निलेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, एनसीसी आणि सैनिक शाळेचे विद्यार्थी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राच्या त्यागामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Comments

No comments yet.