जळगाव, (प्रतिनिधी) २० ऑक्टोबर - जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खत खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (Framework for Fertilizer Sale – FFS) या नवीन तंत्रज्ञानाधारित प्रणालीची अंमलबजावणी येत्या २२ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात केली जाणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळवणे आणि घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करणे शक्य होणार आहे.
जिल्हा परिषद जळगावचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
'FFS' प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
१. घरबसल्या खतांची उपलब्धता आणि बुकिंग
सध्या शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यासाठी किंवा खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या फेऱ्या माराव्या लागतात व रांगेत उभे राहावे लागते. नवीन 'FFS' प्रणालीमुळे शेतकरी मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्वतःच्या परिसरातील दुकानांमध्ये कोणते खत उपलब्ध आहे, हे घरबसल्या पाहू शकतील आणि आवश्यकतेनुसार खतांचे आगाऊ (Advance) बुकिंग करू शकतील.
२. QR कोडद्वारे सुलभ व सुव्यवस्थित खरेदी
या प्रणालीत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या तपशिलांच्या आधारे एक डिजिटल QR कोड तयार केला जाईल. शेतकरी खत विक्री केंद्रावर जाऊन हा QR कोड दाखवतील. विक्रेत्याने तो स्कॅन करून पडताळणी केल्यानंतर तत्काळ खतांची विक्री केली जाईल. यामुळे विक्री केंद्रांवर होणारी गर्दी टळेल.
३. लिंकिंग आणि इतर वस्तूंच्या सक्तीला बसणार आळा
अनेकदा खत खरेदी करताना शेतकऱ्यांना इतर कृषी निविष्ठा किंवा औषधे खरेदी करण्याची सक्ती (लिंकिंग) केली जात असल्याच्या तक्रारी येतात. FFS प्रणालीमधील पारदर्शकतेमुळे ही बेकायदेशीर सक्ती रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
४. काळाबाजार आणि अनधिकृत साठवणुकीवर नियंत्रण
खतांची अनधिकृत साठवणूक, काळाबाजार, साठेबाजी आणि खतांचा कृषीव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी ही डिजिटल व्यवस्था अत्यंत प्रभावी ठरेल. सर्व व्यवहारांची नोंद डिजिटल पद्धतीने होणार असल्याने संपूर्ण वितरण व्यवस्थेवर कृषी विभागाचे थेट नियंत्रण राहील.
कृषी विभागाचे आवाहन
ही प्रणाली शेतकरीकेंद्रित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित खत वितरण व्यवस्थेतील एक क्रांतिकारक पाऊल आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या 'FFS' प्रणालीची माहिती करून घ्यावी आणि डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.