नाशिक, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - नाशिक शहरातील रामवाडी परिसरातील अत्यंत मोक्याच्या भूखंड खरेदी-विक्री व्यवहारात मूळ मालक असलेल्या महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवहाराचे पैसे न देताच गुंडांमार्फत दहशत व दमदाटी करून बेकायदेशीर खरेदीखत आणि विकसन करारनामे (Development Agreements) करून घेतल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संशयितांवर गुन्हा दाखल
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चंदूलाल खेमाणी, कमल खेमाणी, शोभा मुनोत, प्रकाश मुनोत, विमलबाई मुनोत आणि आत्माराम पाटील या संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सोनाली रामकृष्ण मोरे (रा. आरटीओ रासबिहारी लिंकरोड) यांनी पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नेमका काय आहे प्रकार?
मिळकतीचा व्यवहार: रामवाडी परिसरातील सर्व्हे नंबर २३-२-१, २३-१-४, २३-५ आणि २३-६ या मिळकतींचा व्यवहार जून २००३ पूर्वी चंदूलाल खेमाणी आणि कमल खेमाणी यांच्यासोबत झाला होता.
फसवणूक व दमदाटी: संशयितांनी ठरल्याप्रमाणे व्यवहाराची पूर्ण रक्कम अदा न करताच पीडित महिलेची फसवणूक केली. इतकेच नव्हे, तर गुंडांच्या माध्यमातून दहशत व दमदाटी निर्माण करून बेकायदेशीर करारनामे करून घेतले, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पुढे केले बेकायदेशीर व्यवहार: या बेकायदेशीर करारनाम्यांच्या आधारे संशयितांनी पुढील संशयितांना (मुनोत व पाटील) अनधिकृतपणे खरेदीखत आणि विकसन करारनामे करून दिले.
आपल्या मालकीच्या जमिनीची कोणतीही योग्य किंमत न देता, केवळ दहशतीच्या जोरावर हे सर्व दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पीडित महिलेने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.