येवला, (प्रतिनिधी) ५ सप्टेंबर - मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात येऊन येवला तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख पुसण्याचे काम करण्यात येत आहे. आगामी काळात अधिक पाण्याची उपलब्धता करून हा संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून महापारेषणचे ५० एमव्हीए क्षमतेचे अतिउच्च दाब केंद्र निर्माण करून येवला तालुक्याचा विजेचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचे प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
नगरसुल आणि पाटोदा गटांतील विविध प्रश्नांबाबत शेतकरी बांधवांनी आज येवला संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी गटातील सर्व प्रश्न समजून घेत हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अरुण थोरात, संभाजी पवार, डॉ.सुधीर जाधव, बबनराव साळवे, गोरख पवार, मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, सुनील पैठणकर, अल्केश कासलीवाल, ॲड.मंगेश भगत यांच्यासह नगरसुल गटातील शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, नगरसुल परिसरात शेतकऱ्यांना विजेचा जो प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून पुढील आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. संपूर्ण येवला तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपकेंद्र आणि इतर कामे सुरू आहे. तसेच अनेक कामे मंजुरीसाठी आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून महापारेषणचे ५० एमव्हीए क्षमतेचे अतिउच्च दाब केंद्र निर्माण करून येवला तालुक्याचा विजेचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली काढण्याचे प्रयत्न आहे. लवकरच विजेची ही कामे मार्गी लावण्यात येऊन तालुक्यातील सर्व विजेचे प्रश्न सोडविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यातून पाणी डोंगरगाव साठवण तलावापर्यंत पोहचविण्यात आले आहे. या कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण झाल्याने या वर्षी अगदी कमी कालावधीत हे पाणी पोहचविले आहे. त्यामुळे अनेक बंधारे भरण्यात आले आहे. या वर्षी अल निनो चा प्रभाव असल्याने पाऊस कमी झालेला आहे. तरी देखील आलेल्या पाण्याचे योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी बांधवांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव साठवण तलावापासून बंधारे भरत भरत शेवटपर्यंत बंधारे सर्व भरण्याचे नियोजन आहे. मात्र अनेक ठिकाणी गेट उघडून बंधारे भरण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे यामध्ये शेतकरी बांधवांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. मांजरपाडा प्रकल्पाला अधिकचे पाणी कसे मिळेल यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे. एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा येवला तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्याचे प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात अधिकचे पाणी उपलब्ध करून बारमाही पाण्याची सुविधा केली जाईल. शेतकऱ्यांना जास्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील असे त्यांनी सांगितले.