माझ्या जीवनातील दीपस्तंभ....गोखले एज्युकेशन सोसायटीचे शिल्पकार, पितृतुल्य डॉ. मो.स. गोसावी (आप्पा) आणि डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी (माई)

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

नाशिकमध्ये आपल्या शैक्षणिक कार्याने गोखले एज्युकेशन सोसायटीला नवी उंची देणारे पितृतुल्य डॉ. मो. स. गोसावी—आप्पा—आणि सर्व सहकाऱ्यांना मायेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी—माई—यांची आठवण सदैव मनात राहते.

“कौन बतावे बाट गुरु बिन…” या उक्तीप्रमाणे आप्पा आणि माई माझ्या जीवनातील दीपस्तंभ ठरले.

गोखले एज्युकेशन सोसायटीसाठी आप्पांचे योगदान अतुलनीय आहे. संस्थेला दिशा देताना आप्पा आणि माईंनी अनेक स्वप्ने पाहिली आणि अथक परिश्रमांनी ती साकार केली. त्यापैकीच एक महत्त्वाचे स्वप्न म्हणजे १९८५ साली सुरू झालेले महिला महाविद्यालय—पूर्वीचे जिज्ञासा महाविद्यालय आणि आजचे एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय.

त्या काळात मुलींसाठी स्वतंत्र उच्च शिक्षणाची संधी मर्यादित होती. अशा वेळी केवळ मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याचा विचार अत्यंत दूरदृष्टीचा होता. आज मागे वळून पाहताना त्या निर्णयाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते.

एका विद्यार्थिनीचा प्रवास

मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. या महाविद्यालयाने मला केवळ शिक्षण दिले नाही, तर माझे संपूर्ण आयुष्य घडवले.

मी प्रवेश घेतला तेव्हा माई प्राचार्या होत्या. सुरुवातीला माझ्यासाठी त्यांची ओळख केवळ “महाविद्यालयाच्या प्राचार्या” एवढीच होती. मात्र विविध कार्यक्रमांमधून त्यांची व्याख्याने ऐकताना त्यांच्या ज्ञानाचा आवाका, ओघवती भाषा, प्रभावी शैली, साधेपणा, शिस्त आणि शांतपणे काम हाताळण्याची कला जाणवली.

त्यांच्या चालण्यातून, बोलण्यातून आणि वागण्यातून नकळत खूप काही शिकायला मिळाले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मुलाखतीसाठी मी याच महाविद्यालयात आले. मुलाखतीदरम्यान एका प्रश्नावर मी गोंधळले. माईंनी शांतपणे मला सावरले आणि प्रेमाने मार्गदर्शन केले. त्या प्रसंगातून त्यांच्या मायेची आणि समोरच्या व्यक्तीला घडवण्याची वृत्ती जाणवली.

योगायोगाने मला याच महाविद्यालयात नोकरी मिळाली. प्राचार्य डी. के. गोसावी सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली. व्याख्याने, चर्चासत्रे, एन.एस.एस. आणि एन.सी.सी. अशा विविध उपक्रमांत काम करताना माझ्यात नियोजन, व्यवस्थापन, संघभावना, नेतृत्व आणि जबाबदारीची कौशल्ये विकसित झाली. नंतर स्टाफ वेल्फेअर समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इतर महाविद्यालयांतील सहकारी म्हणायचे, “आमच्याकडे अशा समित्याच नाहीत.” तेव्हा आपल्या महाविद्यालयाची कार्यपद्धती किती विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध आहे, याची जाणीव होत असे. विविध समित्या, कामाची योग्य विभागणी आणि “ज्याचे काम त्याने जबाबदारीने करावे” ही कार्यसंस्कृती आम्हाला येथे शिकायला मिळाली.

माईंकडून शिकलेले नेतृत्व

काम छोटे असो वा मोठे, प्रत्येक कामाचे महत्त्व असते—हे माईंकडून शिकले. चांगले काम केल्यास मनापासून कौतुक करणे आणि चूक झाल्यास रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगणे, ही नेतृत्वाची खरी पद्धत त्यांनी दाखवून दिली.

एखादा कर्मचारी दिसला नाही तर, तो रजेवर असला तरी “आज दिसला नाही, काय झाले असेल?” अशी विचारपूस त्या करीत. या छोट्याशा कृतीतून त्यांचा जिव्हाळा जाणवत असे.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकारी मिळून महाविद्यालय एका मोठ्या कुटुंबासारखे होते. त्या कुटुंबाला प्रेमाने जोडून ठेवण्याचे आणि प्रत्येकाकडून सर्वोत्तम काम करून घेण्याचे कौशल्य माईंकडे होते.

माईंकडून मिळालेले संस्कार महाविद्यालयापुरते मर्यादित राहिले नाहीत. माणसांशी आदराने वागणे, त्यांच्या कामाचे कौतुक करणे, चुका प्रेमाने समजावून सांगणे आणि प्रत्येकाला सन्मान देणे—ही शिकवण माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाली.

आप्पांची दूरदृष्टी

पितृतुल्य आप्पांनी या महिला महाविद्यालयात कौशल्याधारित आणि व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची दूरदृष्टी दाखवली. मुलींना रोजगार, स्वावलंबन आणि आत्मविश्वास मिळावा, हा विचार त्या काळाच्या कितीतरी पुढचा होता.

निवडक अभ्यासक्रम सुरू करून त्यांनी मुलींच्या भविष्यासाठी नवी दालने खुली केली. विविध स्पर्धा, उपक्रम आणि व्याख्यानांमधून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व, नेतृत्व, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास घडला.

हे महाविद्यालय म्हणजे माझ्यासाठी विश्वविद्यालय

माझ्या आयुष्याचा निम्म्याहून अधिक काळ या महाविद्यालयात गेला. मी येथे केवळ शिकले किंवा काम केले नाही; या महाविद्यालयाबरोबरच घडत गेले.

असंख्य मुलींना या महाविद्यालयाने स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. येथील प्रत्येक शिक्षक माझ्यासाठी आचार्य होता. त्यांच्या ज्ञानातून, विचारांतून आणि सहवासातून जीवनमूल्ये शिकायला मिळाली.

अडचणी आल्या तरी खचून न जाणे, खचल्यास पुन्हा उभे राहणे, जबाबदारी स्वीकारणे आणि माणसे जोडणे—हे सर्व येथेच शिकले.

“Thank you” आणि “सुखी रहा”

एका कॉन्फरन्सनंतर सोसायटी ऑफिसमध्ये जेवणाची व्यवस्था होती. जेवणानंतर आप्पा उठताना थोडे अस्वस्थ झाले. मी त्यांना आधार दिला, गाडीपर्यंत नेले आणि नमस्कार केला.

त्या वेळी त्यांनी मला “Thank you” म्हटले आणि प्रेमाने “सुखी रहा” असा आशीर्वाद दिला.

हे दोन शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले. एवढ्या मोठ्या व्यक्तीने एका स्टाफ सदस्याला धन्यवाद देणे आणि आशीर्वाद देणे, ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट होती. त्यातून आप्पांची नम्रता, माणुसकी आणि समोरच्याला सन्मान देण्याची वृत्ती जाणवली.

“सुखी रहा” हा माझ्यासाठी केवळ आशीर्वाद नव्हता; तो आयुष्यभर जपून ठेवावा असा प्रसाद होता.

प्रेमाची शिदोरी आणि माईंचे नीटनेटकेपण

महाविद्यालयातील Production Oriented Training (P.O.T.)—उत्पादनसह प्रशिक्षण उपक्रमांतर्गत तयार केलेले खाद्यपदार्थ आम्ही माई आणि आप्पांना “प्रेमाची शिदोरी” म्हणून दिले.

माईंनी मला ते टेबलवर ठेवण्यास सांगितले. त्यांच्या किचनमध्ये गेल्यावर स्वच्छता, शिस्त आणि नीटनेटकेपणा पाहून मी प्रभावित झाले. भांडी, ताटे, वाट्या, चमचे आणि पाण्याची भांडी अत्यंत व्यवस्थित मांडलेली होती. बाजूला ठेवलेली छोटीशी फुलदाणीही मन प्रसन्न करून गेली.

महाविद्यालयातील माईंची शिस्त त्यांच्या घरातील जीवनातही तितकीच सुंदरपणे दिसत होती. त्यांच्या केसांतील सुंदर फूल, साधा पेहराव, नीटनेटके राहणीमान आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व मनात कायम राहिले.

जिज्ञासू आप्पा

आप्पा सृजन प्रदर्शनाला आले की प्रत्येक स्टॉलवर थांबून विद्यार्थिनींना प्रश्न विचारत. त्यांच्या जिज्ञासेचे मला नेहमीच आश्चर्य वाटे.

नंतर जाणवले की, मोठ्या व्यक्तींचे मोठेपण त्यांच्या सतत शिकण्याच्या वृत्तीत असते. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता आणि समोरच्याला विचार करायला प्रवृत्त करण्याची क्षमता ही आप्पांची खरी ताकद होती.

माई आणि आप्पांनी सुरू केलेले हे महाविद्यालय माझ्यासाठी केवळ महाविद्यालय नाही; ते एक विश्वविद्यालय आहे. येथे पुस्तकातील ज्ञानाबरोबरच माणूस म्हणून घडण्याची, संकटात खंबीर राहण्याची, जबाबदारी स्वीकारण्याची, माणसे जोडण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण मिळाली.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

गुरु म्हणजे केवळ शिकवणारी व्यक्ती नव्हे; आपली क्षमता ओळखणारी, चुकताना सावरणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद देणारी व्यक्ती म्हणजे गुरु.

आप्पा आणि माई, आपण माझ्या आयुष्यात अशीच गुरुतुल्य माणसे आहात.

आपल्या दूरदृष्टीला मनःपूर्वक सलाम!

आपण दिलेल्या शिक्षणाला, संस्कारांना आणि आयुष्य घडवणाऱ्या संधींना मनःपूर्वक धन्यवाद!

या महाविद्यालयाने माझ्या आयुष्याचा अत्यंत सुंदर भाग घडवला आणि त्या प्रक्रियेत आपला वाटा आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि कृतज्ञतेची गोष्ट आहे.

आपण मला केवळ शिकवले नाही;

आपण मला घडवले.

आपण मला केवळ ज्ञान दिले नाही;

तर आयुष्य जगण्याची दृष्टी दिली.

आपण मला केवळ संधी दिली नाही;

तर त्या संधीचे सोने करण्याची ताकद दिली.

हे ऋण मी आयुष्यभर कृतज्ञतेने जपेन.

आपणा सर्वांना शतशः नमन

आणि मनःपूर्वक कृतज्ञता!

आपलीच,

प्रा.सौ वैशाली चौधरी  

एक कृतज्ञ विद्यार्थिनी आणि सहकारी
9881266188

Comments

No comments yet.