चक्क कापसाच्या झाडानेच दाखल केली फिर्याद... मालपूरमधील ‘शेतातील कोर्ट’ चर्चेत...

Share:
Main Image
Last updated: 31-Aug-2026

अमळनेर, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - बदलत्या हवामानाचे आव्हान आणि किडी-रोगांच्या आक्रमणामुळे संकटात सापडलेल्या कापूस पिकाला वाचवण्यासाठी अमळनेर तालुक्यातील मालपूर येथे “शिदोरी अनुभवाची – शेती शाळा शेतकऱ्यांची” या अंतर्गत एक अत्यंत अभिनव उपक्रम पार पडला. मनोरंजनातून शिक्षण आणि प्रत्यक्ष सहभागातून ज्ञान देणाऱ्या “शेतातील कोर्ट” आणि “कापसाला राखी” या संकल्पनांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या विशेष शेती शाळेस जळगावचे जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी (अमळनेर) आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

१. 'शेतातील कोर्ट' – कापसाच्या झाडाची अनोखी फिर्याद

या उपक्रमात कापसाच्या झाडानेच हवामान बदल, बदलते वातावरण, किडी व रोग यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या काल्पनिक सुनावणीचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले.

कोर्टाचे स्वरूप: न्यायाधीशांचे पीठ, वकील, साक्षीदार, आरोपीच्या पिंजऱ्यात किडी-रोग आणि फिर्यादीच्या भूमिकेत प्रत्यक्ष कापसाचे पीक!

मिळालेला संदेश: कापूस पिकासमोरील समस्या, त्यामागील शास्त्रीय कारणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती रंजक पद्धतीने मांडण्यात आली. “हवामान बदल थांबवणे आपल्या हातात नसेल, पण बदलत्या हवामानानुसार शेतीचे योग्य नियोजन करणे नक्कीच आपल्या हातात आहे,” हा महत्त्वपूर्ण विचार या नाटकातून देण्यात आला.

२. कापसाला राखी – 'माझे पीक, माझी जबाबदारी!'

रक्षाबंधनाच्या औचित्याने महिला शेतकरी भगिनींनी शेतात जाऊन कापसाच्या झाडांना विविध रंगांच्या राख्या बांधल्या.

ही राखी केवळ एक धागा नसून, पिकाची कीड-रोगांपासून सुरक्षा करण्याची आणि “माझे पीक – माझी जबाबदारी” हा संकल्प दृढ करणारी ठरली.

ज्ञान, अनुभव आणि संस्कृतीचा संगम

महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यामुळे ही ‘शेती शाळा’ पारंपरिक प्रशिक्षणापलीकडे जाऊन शेतकरी बांधवांसाठी ज्ञानवर्धक ठरली. पिकांच्या समस्यांकडे नव्या शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा या उपक्रमाने दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Comments

No comments yet.