मुलीला दाखवली जादूटोण्याची भीती... जबरदस्तीने केला स्वतःच्या मुलाशी साखरपुडा... भोंदू गजाआड...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - आजारातून मुक्तता करणे आणि अंगातील वाईट शक्तींचा नाश करण्याच्या बहाण्याने एका पीडित महिलेची दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची आर्थिक फसवणूक करत अघोरी कृत्य करणाऱ्या नाशिकच्या महिला मांत्रिकाचा पर्दाफाश झाला आहे. एवढेच नाही तर, जादूटोण्याची भीती दाखवून पीडितेच्या २१ वर्षांच्या तरुण मुलीला कुटुंबीयांपासून दूर करत स्वतःच्या मुलाशी तिचा जबरदस्तीने साखरपुडा उरकल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मदतीने धुळे शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे पोलिसांनी नाशिकमधून संशयित महिला मांत्रिक व तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

आजारपणाचा गैरफायदा अन् अघोरी कृत्यांचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील पीडित महिला मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. सततच्या आजारपणामुळे त्या आर्थिक अडचणीत होत्या. या दरम्यान त्यांच्या दोन मैत्रिणींनी त्यांची ओळख नाशिक येथील सरिता मनोज जाधव या मांत्रिक महिलेशी करून दिली. समस्या ऐकल्यानंतर सरिता जाधव हिने पीडितेच्या अंगावरून लिंबू फिरवून त्याचा रस पाण्यात पिळला. त्यात राख टाकून ते पाणी पीडितेला पिण्यास दिले व पेढा खायला दिला. त्यानंतर पीडितेच्या अंगात आल्यासारखे झाले.

मांत्रिकेने पीडितेच्या डोक्याचे केस उपटून "माझे वचन पाळले नाही तर आणखी वाईट होईल, स्मशानात पूजा करावी लागेल," अशी भीती घातली. यासाठी नाशिकला बोलावून ११ अमवस्या व १० पोर्णिमेचे उतारे करण्यासाठी १ लाख ५१ हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या पीडित महिलेने सुरुवातीला १ लाख ३० हजार रुपये रोख दिले.

गंगाघाट अन् केवडीबन येथे अघोरी पूजा

Advertisement

१४ जुलै २०२६ रोजी अमावस्येच्या दिवशी मांत्रिक सरिता हिने पीडित महिलेला नाशिकच्या गंगाघाटाजवळील केवडीबन येथे नेले. तेथे तिला स्नान घालून लिंबाचा रस थेट तिच्या डोळ्यात टाकला. अंगावरील कपडे नदीत फेकून देऊन नवीन कपडे घालण्यास भाग पाडले. त्यानंतर मुंबई नाका येथील तिच्या घरी नेऊन काळे तीळ आणि राखेच्या साह्याने अघोरी पूजा केली. या सर्व प्रकारानंतर पीडितेकडून जबरदस्तीने आणखी ३० हजार रुपये उकळण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ लाख ६० हजार रुपयांची लूट करण्यात आली.

भीती दाखवून मुलीचा जबरदस्तीने साखरपुडा

आर्थिक लुटीनंतर मांत्रिक महिलेची वक्रदृष्टी पीडितेच्या २१ वर्षांच्या मुलीवर पडली. "तुझ्या घरात दुष्ट शक्ती आहेत, मुलीला ४० दिवस धुळ्यातील मैत्रिणीकडे ठेव," असे सांगून मुलीला तिच्या कुटुंबापासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर "मुलीचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले तरच तुमचे संकट टळेल," असा भ्रम पसरवला.

भीतीच्या सावटाखाली असलेली मुलगी मांत्रिकेच्या जाळ्यात अडकली आणि तिने स्वतःच्या घरी परतण्यास नकार दिला. २४ जुलै २०२६ रोजी मांत्रिक सरिता जाधव हिने मुलीचा साखरपुडा स्वतःचा मुलगा गणेश मनोज जाधव याच्याशी जबरदस्तीने उरकून घेतला. यानंतर सर्व संशयितांनी पीडित कुटुंबाशी संपर्क पूर्णपणे तोडून टाकला.

'अंनिस'च्या मदतीने धुळे पोलिसांत गुन्हा; संशयित गजाआड

आपली फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी (अंनिस) संपर्क साधला. 'अंनिस'चे कार्यकर्ते रणजित शिंदे, नवल ठाकरे, भूषण पाटील व नितीन बागुल यांनी पीडित कुटुंबाला धीर देऊन पोलीस ठाण्यात जाण्याचे धाडस दिले.

त्यानुसार २७ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात मांत्रिक सरिता जाधव व तिच्या साथीदारांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे शहर पोलिसांनी तत्परता दाखवत नाशिक गाठले व नाशिक पोलिसांच्या मदतीने सर्व संशयितांना बेड्या ठोकल्या. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे करत आहेत.

 

Comments

No comments yet.