'एसीबी'चा जोरदार दणका... महावितरणचा तंत्रज्ञ आणि २० हजार उकळणारा तलाठी रंगेहात...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

नंदुरबार/धुळे, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - उत्तर महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक सत्र राबवत लाचखोरांना चांगलाच दणका दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'अंतर्गत फोटो अपलोड करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला रंगेहात पकडण्यात आले, तर धुळ्यात पांझरा नदीतून रेती वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्यासह दोन खाजगी इसमांना 'एसीबी'च्या जाळ्यात ओढण्यात आले. या दोन्ही मोठ्या कारवायांमुळे शासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

पहिली कारवाई (नंदुरबार): सौर कृषी पंपाच्या फोटो अपलोडिंगसाठी दोन हजारांची लाच

शासनाच्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजने'अंतर्गत शेतात सौर कृषी पंप मिळवण्यासाठी नवापूर तालुक्यातील एका ३६ वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांनी ऑनलाईन अर्ज केला होता. या योजनेनुसार लाभार्थी शेतकरी आणि शेतातील बोअरवेलचे छायाचित्र महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक असते. हे काम खांडबारा (ता. नवापूर) येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र भामट्या वसावे (वय ४०) याच्याकडे प्रलंबित होते.

छायाचित्रे अपलोड करून देण्याच्या मोबदल्यात वसावे याने तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयांच्या लाचेची उघड मागणी केली होती. वारंवार खेटे मारूनही काम होत नसल्याने तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी नंदुरबार 'एसीबी'कडे तक्रार नोंदवली. पडताळणीदरम्यान संशयिताने तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार मंगळवारी (२९ सप्टेंबर) खांडबारा ते मेहंदीपाडा रस्त्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने वसावे याला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Advertisement

दुसरी कारवाई (धुळे): रेती वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी २० हजारांची लाच; तलाठ्यासह ३ जण जाळ्यात

दुसऱ्या घटनेत, धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीपात्रातून रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अवैध गौण खनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी लाच मागितल्याचे उघडकीस आले. तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी कौठाळचा अतिरिक्त कार्यभार असलेले कुसुंबा सजाचे तलाठी मोहित बाबासाहेब वारे यांनी खाजगी इसम प्रदीप विश्वास पाटील याच्यामार्फत २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत नाशिक 'एसीबी'कडे तक्रार दाखल झाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत तलाठी मोहित वारे याने तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारून ते रक्कम सोबत असलेला खाजगी इसम स्वप्निल रामकृष्ण देसले याच्याकडे सोपवताच, दबा धरून बसलेल्या 'एसीबी'च्या पथकाने तलाठी वारे, प्रदीप पाटील आणि स्वप्निल देसले या तिघांनाही जागीच ताब्यात घेतले.

या तिघांविरुद्ध धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक लाप्रविच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास धुळे एसीबीच्या पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करत आहेत.

'एसीबी'चे आवाहन:

शासकीय कामांसाठी कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.