चिमुकल्यांपासून ६९ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत... त्रिंगलवाडी किल्ल्यावर २३९ महिलांचे अभूतपूर्व गिर्यारोहण...

Share:
Main Image
Last updated: 29-Sep-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २९ सप्टेंबर - गड-किल्ल्यांचा समृद्ध इतिहास आणि सह्याद्रीची आव्हानात्मक शिखरे ही केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नसून ‘सह्याद्रीच्या वाटा... आता तिच्याही!’ हा नवा संदेश देत नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ल्यावर तब्बल २३९ महिलांनी यशस्वी गिर्यारोहण केले. सह्याद्री मित्र संमेलनाच्या पाचव्या वर्षाच्या वाटचालीनिमित्त ‘महिला विशेष वर्ष २०२७’ अंतर्गत या भव्य ‘महिला विशेष ट्रेक’चे आयोजन करण्यात आले होते. अवघ्या ४ वर्षे ६ महिन्यांच्या चिमुकलीपासून ते ६९ वर्षांच्या आजींपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी यात सहभाग नोंदवत सह्याद्रीच्या कुशीत एक नवा इतिहास रचला.

पोलीस उपायुक्त माधव रेड्डी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ

या महिला विशेष ट्रेकचा उत्साह रविवारी भल्या पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. सकाळी ७.१५ वाजता नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री. माधव रेड्डी यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून (फ्लॅग ऑफ) ट्रेकला अधिकृत सुरुवात करण्यात आली. महिलांना गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा, शारीरिक तंदुरुस्तीसोबतच गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष अनुभवावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बसेस आणि टेम्पो ट्रॅव्हलर्सची जय्यत तयारी

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले होते. ६ मोठ्या बसेस आणि २६ आसनी २ टेम्पो ट्रॅव्हलर अशा एकूण ८ वाहनांच्या ताफ्यातून महिला त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्या. प्रवासादरम्यान आणि संपूर्ण ट्रेकमध्ये सहभागी महिलांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता.

इगतपुरी पोलीस आणि वनखात्याची भक्कम सुरक्षा

महिलांची मोठी संख्या लक्षात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इगतपुरी पोलीस ठाणे आणि वनखात्याच्या इगतपुरी विभागाने विशेष सहकार्य केले. संपूर्ण ट्रेकदरम्यान वनखात्याचे व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तैनात होते. त्यांनी महिलांना सुरक्षेच्या सूचना देण्यासोबतच संपूर्ण मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला.

इतिहास अभ्यासकांकडून त्रिंगलवाडीची सफर

केवळ किल्ला चढणे एवढाच या ट्रेकचा हेतू नव्हता, तर ऐतिहासिक साक्षरता घडवणे हाही मुख्य भाग होता. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर नाशिकचे प्रसिद्ध हेरिटेज अभ्यासक रमेश पडवळ यांनी सहभागी महिलांना त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती, वास्तुवैशिष्ट्ये, भौगोलिक महत्त्व आणि ऐतिहासिक लढायांबद्दल सविस्तर माहिती दिली.

Advertisement

पारंपरिक शस्त्रकलेने जिंकली मने

गडाच्या माथ्यावर पवन माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या मुलींच्या ‘राष्ट्रवीर संघा’तर्फे पारंपरिक मराठी शस्त्रकलेचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तलवारबाजी, लाठीकाठी आणि दांडपट्टा यांसारख्या कलांचे प्रात्यक्षिक पाहताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मुलींच्या शिस्त आणि कौशल्याचे सर्व महिलांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

नाशिक बनणार 'Trekking Hub of India'

नाशिकची ओळख आता ‘ट्रेकिंग हब ऑफ इंडिया’ (Trekking Hub of India) म्हणून वेगाने विकसित होत आहे. या प्रवासात नव्या पिढीसोबतच महिलांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे.

"गिर्यारोहणाकडे केवळ एक साहस म्हणून न पाहता, तो आत्मविश्वास वाढवणारा, निसर्गाशी नाते जोडणारा आणि आपल्या इतिहासाशी नाळ घट्ट करणारा अनुभव आहे. सह्याद्रीच्या वाटांवर महिलांनी अधिक संख्येने यावे आणि गिर्यारोहण ही त्यांची संस्कृती बनावी, हा आमचा मुख्य विचार आहे."

— डॉ. मानसी नांदूरकर (सह्याद्री मित्र संमेलन)

 

सह्याद्री मित्र संमेलन आयोजन समिती, व्यवस्थापन समिती आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे हा ट्रेक अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडला. निसर्गाचा आनंद, इतिहासाची माहिती आणि साहसाची अनुभूती देणारा हा महिला विशेष ट्रेक नाशिकच्या गिर्यारोहण क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे.

 

 

Comments

No comments yet.