नाशिकमध्ये पुनर्रोपणाचा अट्टाहास कशासाठी? तज्ज्ञांनी सुचवला वृक्ष संवर्धनाचा नवा मार्ग...

Share:
Main Image
Last updated: 05-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ मे - नाशिकमध्ये विकासकामांसाठी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला, तरी या प्रक्रियेच्या यशाबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. "पुनर्रोपण म्हणजे केवळ झाड एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणे नव्हे, तर ती एक अत्यंत जटिल वैज्ञानिक प्रक्रिया आहे. सध्या ज्या पद्धतीने झाडांचा विस्तार छाटून बोडकी खोडं लावली जात आहेत, ते पुनर्रोपण नसून वृक्षांची फसवणूक आहे," अशा शब्दांत 'आपलं पर्यावरण' संस्थेचे शेखर गायकवाड यांनी प्रशासनाचे डोळे उघडले आहेत.

अशास्त्रीय पद्धतीवर ओढले ताशेरे

गायकवाड यांच्या मते, पुनर्रोपणाची योग्य व्याख्या म्हणजे वृक्षाचे एकही पान न तोडता, आहे त्या परिस्थितीत त्याचे स्थलांतर करणे. मात्र, सध्या खालील त्रुटी प्रकर्षाने जाणवत आहेत:

अघोरी छाटणी: झाडाचा पूर्ण विस्तार छाटून फक्त १०-१५ फूट खोड ठेवले जाते. यामुळे झाडाची अन्नाभिसरण प्रक्रिया विस्कळीत होते.

मुळांची हानी: जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने मुळे ओरबाडून काढली जातात. पोषकतत्वे पुरवणारी सूक्ष्म मुळे तुटल्यामुळे झाडाची कार्यक्षमता संपते.

यंत्रणेचा अभाव: झाड अलगद उचलून नेणारी प्रगत यंत्रणा आणि रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे झाडाच्या सालीला साखळदंडाने इजा पोहोचते.

Advertisement

मातीतील भिन्नता: ज्या ठिकाणाहून झाड काढले जाते आणि जिथे लावले जाते, तिथल्या मातीच्या प्रकारात (मुरमाड, काळी किंवा खडकाळ) तफावत असल्यास झाड जगण्याची शक्यता कमी असते.

'ती' पालवी म्हणजे पुनर्जन्म नव्हे!

बऱ्याचदा पुनर्रोपण केलेल्या खोडाला काही दिवसांनी पालवी फुटते आणि ते जगले असा समज होतो. यावर गायकवाड सांगतात की, "ती पालवी खोडाच्या सालीत असलेल्या साठविलेल्या जीवनसत्वामुळे फुटलेली असते. मुळांना झालेल्या हानीमुळे ही पालवी कालांतराने गळून पडते आणि खोड वाळून जाते. नाशिकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीने करण्यात आलेले एकही पुनर्रोपण यशस्वी झालेले नाही."

पर्यायी मार्ग: संवर्धनावर भर द्या

पुनर्रोपणासाठी लागणारा प्रचंड खर्च, वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवण्यापेक्षा तोच निधी पर्यावरणपूरक वृक्षांच्या मोठ्या रोपांच्या लागवडीसाठी वापरावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ८-१० फूट उंचीची नवीन रोपे लावल्यास ती नैसर्गिकरीत्या लवकर वाढतात आणि निसर्गाला खऱ्या अर्थाने हातभार लावतात.

"पुनर्रोपण म्हणजे खरंतर झाड काढण्याची एक कायदेशीर पळवाट वाटू लागली आहे. ३६५ दिवस काळजी घेण्याची तयारी असेल, तरच या प्रक्रियेचा विचार व्हावा, अन्यथा पैसा आणि श्रम दोन्ही वाया जातील."

— शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक.

Comments

No comments yet.