नसरापूरच्या घटनेवर राज ठाकरेंचा तीव्र संताप... "त्या नराधमाला..."

Share:
Main Image
Last updated: 05-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ५ मे - पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला असून, "अशा नराधमाला कोणताही कायदेशीर विचार न करता हालहाल करून संपवले पाहिजे," अशी मागणी केली आहे. तसेच, महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या शोषणाचे प्रमाण का वाढत आहे, याचा सर्वांगीण विचार करण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सत्तेचा 'भस्मासुर' आणि समाजाचा कोडगेपणा

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीवर गंभीर भाष्य केले आहे. ते म्हणतात, "महाराष्ट्रात कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही. 'सत्ता' मिळवणे आणि ती गाजवणे याचा एक भस्मासुर वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालत आहे. राजकारण्यांपासून ते अगदी साहित्यिक संस्थांपर्यंत प्रत्येक जण सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहे. वर जे घडतंय, त्याचेच प्रतिबिंब खाली उमटत असून दुबळा माणूस आपल्यापेक्षा अधिक दुबळ्यांचे शोषण करत आहे."

प्रशासकीय 'फास्टट्रॅक'वर प्रश्नचिन्ह

नसरापूर घटनेनंतर झालेल्या आंदोलकांवरील लाठीमाराचाही त्यांनी निषेध केला. "फास्टट्रॅक कोर्टाच्या वल्गना करणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगावी. आंदोलकांवर लाठीमार करण्यासाठी दाखवलेली तत्परता प्रशासन गुन्हेगारांच्या बाबतीत का दाखवत नाही?" असा टोकदार सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

राज ठाकरेंनी मांडलेली प्रमुख निरीक्षणे:

Advertisement

धाक संपलाय: पूर्वी समाजात कोणाचे तरी कोणावर लक्ष असायचे, चुकीच्या गोष्टीची भीती असायची, ती आता पूर्णपणे नष्ट झाली आहे.

मूल्यव्यवस्थेचा ऱ्हास: १९९५ नंतर उदारीकरणाच्या लाटेत जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त झाली आणि समाज 'व्यक्तिकेंद्रित' आणि 'लालसाकेंद्रित' झाला.

विस्कटलेली घडी: हाताबाहेर गेलेली लालसा, ओटीटी (OTT) वरील हिंसक कंटेन्ट, जमिनी आणि पैशांमागे लागलेली धाव यामुळे महाराष्ट्राची घडी विस्कटली आहे.

जखमी महाराष्ट्र: अशा घटनांमुळे महाराष्ट्र आरपार बदलत असून तो अधिक जखमी होत आहे.

सरकारला इशारा

"ज्या महाराष्ट्राने स्त्री शिक्षणाचा पाया घातला, तिथेच अशा घटना वारंवार घडणे हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं विचलित झालेलं 'लक्ष' आणि भरकटलेलं 'लक्ष्य' ताळ्यावर आणण्यासाठी सरकारने तातडीने कृती करावी," असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच, समाज सुस्थितीत आणण्यासाठी आपण आणि आपला पक्ष सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

?s=20

Comments

No comments yet.