त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) २३ जुलै - नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात एक दुर्दैवी घटना घडली असून, एका घराचे पत्रे उडून रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर पडल्याने तीन भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत यवतमाळ येथील एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी काय घडली घटना?
बुधवारी रात्री ८:०२ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर शहरातील मुख्य रस्त्यावरील (मेनरोड) श्री. सारडा यांच्या खाजगी घराचे पत्रे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अचानक उडाले आणि थेट रस्त्यावर पडले. त्याच वेळी तिथून आठ भाविकांचा समूह जात होता. उडालेले पत्रे थेट या भाविकांच्या अंगावर आदळल्याने त्यातील तिघे जण जखमी झाले.
या दुर्घटनेत अमित सुभाष आढे (वय २० वर्ष, रा. जोडमोहा, ता. कळम, जि. यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले.
स्थानिकांची तत्परता आणि वैद्यकीय मदत
घटना घडताच स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवले. त्यांनी कसलाही विलंब न करता गंभीर जखमी अमित आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात पोहचवले.
उपजिल्हा रुग्णालयात डॉ. वर्षा वरपे, डॉ. श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी तातडीने अमित यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर पुढील विशेष आणि वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तात्काळ नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलविण्यात आले आहे.
प्रशासनाकडून उपचारांवर बारकाईने लक्ष
दुर्घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमी भाविकाला सर्वतोपरी सहकार्य आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर आणि उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (Dean) वैयक्तिकरित्या या उपचारांचे सनियंत्रण करत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन प्रशासन रुग्णालयाच्या आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सावधानतेचा इशारा
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे आज दि. 23/07/2026 रोजी सकाळी 08:00 वा. गंगापूर धरण, पूर पाणी विसर्ग एकूण 3165 Cuses ने चालू असून,
आज सकाळी 9:30 वा. एकूण 4236 Cuses तसेच
आज सकाळी 10:30 वा. एकूण 5295 Cuses
करण्यात येणार आहे,
पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल याची सर्वांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी.