अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - मारामारीच्या प्रकरणात हाफ मर्डर (खुनाचा प्रयत्न) आणि जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल न करता सौम्य कलमे लावून जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. विनोद शिवाजी मासाळकर (बक्कल नंबर २४६७) असे लाचखोर पोलीस अंमलदाराचे नाव असून, तडजोडीअंती ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला पाथर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदारांच्या हॉटेलवर काम करणारा नोकर मोटारसायकलवरून पाथर्डी गावातून जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून एका अनोळखी ट्रक चालकाशी त्याचा वाद झाला व त्यांच्यात मारामारी झाली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांच्याकडे होता.
मासाळकर याने तक्रारदाराला दमदाटी करत, "तुझ्या हॉटेलवरील नोकरावर हाफ मर्डर आणि रॉबरीचा (जबरी चोरी) गुन्हा दाखल करतो," अशी धमकी दिली. घाबरलेले तक्रारदार जेव्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन मासाळकरला भेटले, तेव्हा त्याने गंभीर गुन्हा दाखल न करण्याचे प्रलोभन दाखवले. "वरिष्ठांना सांगून सौम्य स्वरूपाचा मारामारीचा गुन्हा दाखल करतो, न्यायालयातून लवकरात लवकर जामीन मंजूर करून देतो आणि तपासात मदत करतो," असे सांगत मासाळकर याने सुरुवातीला थेट ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारीची पडताळणी अन् तडजोड
तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी थेट नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने १९ सप्टेंबर २०२६ रोजी पाथर्डी येथे जाऊन तक्रारीची गोपनीय पडताळणी केली.
पडताळणी दरम्यान पोलीस अंमलदार विनोद मासाळकर याने तक्रारदाराच्या नोकरावर गंभीर गुन्हा न नोंदवता जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात ५ लाखांवरून तडजोड करत २ लाख १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचून रंगेहात पकडले
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी दुपारी पाथर्डी पोलीस स्टेशन परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपयांची रोकड पंचांच्या उपस्थितीत स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने झडप घालून विनोद मासाळकर याला रंगेहात ताब्यात घेतले.
त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या सुधारित कलम ७ अन्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एसीबीचे अधिकारी व पथक
सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईचे सापळा अधिकारी म्हणून नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांनी काम पाहिले. त्यांच्या पथकात पोलीस हवालदार दिनेश खैरनार, पोलीस हवालदार अविनाश पवार आणि पोलीस अंमलदार योगेश शिंदे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास अहिल्यानगर एसीबीच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे करत आहेत.
नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तक्रारीचे आवाहन
शासकीय कामासाठी किंवा गुन्ह्यात सवलत देण्यासाठी कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.
* टोल फ्री क्रमांक : १०६४
* नाशिक एसीबी दूरध्वनी : ०२५३-२५७५६२८ / ०२५३-२५७८२३०
* व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक :
* नाशिक : ९९३०९९७७०० / ९५४५०३१०६४
* अहिल्यानगर : ९१६८६४१०६४
* ऑनलाईन पोर्टल : acbmaharashtra.net / acbmaharashtra.gov.in