पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर... त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावर ट्रेकर्सच्या वाहनावर टोळक्याचा हल्ला... चालकाला मारहाण...

Share:
Main Image
Last updated: 20-Sep-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) २० सप्टेंबर - निसर्गरम्य वातावरण, हिरवेगार डोंगर आणि किल्ले यामुळे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका नेहमीच पर्यटकांच्या आणि ट्रेकर्सच्या पसंतीस उतरतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांवर स्थानिक गुंडांकडून हल्ले होण्याचे आणि ऐनकेन कारणाने त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. रविवारी त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील आंबेई गावाजवळ असाच एक गंभीर प्रकार समोर आला. येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिकच्या एका ट्रेकर्स ग्रुपची गाडी अडवून टोळक्याने पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्याने चालकाला वाहनाबाहेर ओढून बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पर्यटकांच्या आणि गिरीभ्रमकांची सुरक्षा पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

‘कट मारल्याचा’ बनाव अन् पैशांची उकळपट्टी

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नाशिकमधील काही उद्योजक, डॉक्टर, महिला आणि इतर नागरिकांचा समावेश असलेला एक ट्रेकर्स ग्रुप जव्हार घाटाजवळील आंबेई डोंगर परिसरात फिरण्यासाठी निघाला होता. ग्रुपचे वाहन आंबेई गावात पोहचले असता, काही स्थानिक तरुणांनी गाडीला अचानक अडवले. "तुमच्या वाहनाने आमच्या गाडीला कट मारला असून त्यात आमचे नुकसान झाले आहे," असा खोटा बनाव रचत या टोळक्याने चालकाकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

अचानक घडलेल्या या प्रकाराने वाहनातील सर्व प्रवासी हादरले. वाहनातील काही सदस्यांनी प्रसंगावधान दाखवून खाली उतरून पाहिले असता, संबंधित तरुणांच्या वाहनाला कुठलाही धक्का बसलेला नव्हता किंवा कुठलेही नुकसान झालेले नव्हते. त्यामुळे चालकाने व प्रवाशांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

साथीदारांना बोलावून चालकाला ओढून मारहाण

पैसे देण्यास नकार दिल्याचे पाहून संतापलेल्या टोळक्याने तात्काळ आपल्या इतर साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच आणखी काही तरुण तेथे दाखल झाले आणि त्यांनी आक्रमक होत ट्रेकर्सच्या वाहनाच्या चालकाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता चालकाला वाहनातून जबरदस्तीने बाहेर ओढून त्याला मारहाण करण्यात आली.

Advertisement

या भयानक प्रसंगी वाहनातील महिला, डॉक्टर आणि उद्योजकांनी तत्परता व धैर्य दाखवले. त्यांनी एकत्रितपणे त्या टोळक्याला ठामपणे खडसावून विरोध केला. प्रवाशांचा आक्रमक पवित्रा आणि वाढता विरोध पाहून अखेर ते टोळके तेथून पसार झाले. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे सर्व पर्यटक मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत परतले.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर पट्ट्यात गुन्हेगारी वाढली

पर्यटकांवर हल्ले होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर नाशिकच्या पर्यटकांच्या वाहनावर हल्ला झाला होता. त्या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यातच हरिहर किल्ल्यावरून पर्यटनाहून परतणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांच्या 'टेम्पो ट्रॅव्हलर'वर घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी परिसरात १० जणांच्या टोळक्याने हल्ला केला होता. त्या घटनेत कर्नाटक येथील चालक नागराज गिरेगौड यांना गाडीतून खाली उतरवून रस्त्यावर आणि पाठलाग करून मारहाण करण्यात आली होती.

मंत्री छगन भुजबळ यांचे कारवाईचे निर्देश

जव्हार घाटाजवळील आंबेई येथे घडलेल्या या ताज्या प्रकाराची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांना तात्काळ या टोळक्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, पर्यटन स्थळांवर आणि मुख्य रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी आता ट्रेकर्स आणि नागरिकांमधून केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.