नाशिकमध्ये ५ दुकाने फोडणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या... असा यशस्वी झाला सापळा...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जुलै - नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला गजाआड करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. नाशिकरोड युनिटने रेल्वेस्थानक परिसरात जाळे रचून छत्रपती संभाजीनगर येथील संशयिताला बेड्या ठोकल्या असून, त्याच्या अन्य तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.

धन्ना रामलाल राठोड (वय ४०, रा. लक्ष्मी टॉकीज, मोंढा मार्केट जवळ, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या टोळीप्रमुख चोरट्याचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

गेल्या मंगळवारी (दि. १४) मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल भागातील दोन मेडिकल दुकाने, एक स्वीट होम, भांडी दुकान आणि एका एजन्सीचे कार्यालय अशी एकूण पाच दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली होती. दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे १ लाख १२ हजार रुपयांची रोकड लांबवली होती. एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी घबराट व चिंतेचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

सीसीटीव्ही अन् तांत्रिक विश्लेषणाने काढला माग

घटनेचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने तातडीने तपासचक्र हलवली. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असतानाच, या गुन्ह्यातील मुख्य म्होरक्या नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरीत्या वावरत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून धन्ना राठोड याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता त्याच्या फरार साथीदारांचा कसून शोध घेत आहेत.

या पथकाने केली कारवाई:

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, दिलीप भोई, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रेय चकोर, राहुल जगताप तसेच अंमलदार केतन सोनवणे, कुणाल घोरपडे, सुशांत दिघे आणि समाधान जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.