नाशिकमध्ये भरदिवसा टोळक्याचा थरार... शाळेतून परतणाऱ्या दोन भावांवर सपासप वार...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जुलै - शाळेतून घराकडे परतणाऱ्या दोन भावांना अडवून टोळक्याने धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील म्हाडा वसाहत परिसरात घडली आहे. या घटनेत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज (आडगाव) येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

शिवतेज नवले असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, तर त्याचे साथीदार ओमकार लभडे, सोहिल शेख, कार्तिक लभडे आणि सुशांत हे चौघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमका प्रकार काय?

याबाबत कुणाल देविदास जाधव (वय १९, रा. साठे मळा, आडगाव शिवार) या युवकाने फिर्याद दिली आहे. कुणाल मंगळवारी (दि. २१) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आपल्या चुलत भाऊ सोहम जाधव याला घेण्यासाठी शाळेत गेला होता. दोन्ही भाऊ दुचाकीवरून घराकडे परतत असताना, म्हाडा वसाहत परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलजवळ संशयित टोळक्याने त्यांना विनाकारण गाठले.

Advertisement

काहीही कारण नसताना टोळक्याने दोन्ही भावांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीदरम्यान संशयितांनी धारदार चाकू आणि कोयत्याने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले.

पोलिसांकडून एकाला बेड्या

घटनेची माहिती मिळताच जखमींचे चुलते संतोष जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांनाही आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले.

घटनेचे गांभीर्य ओळखून आडगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य संशयित शिवतेज नवले याच्या मुसक्या आवळल्या आहेत. फरार झालेल्या उर्वरित चार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.