सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन... उपस्थितही झाले थक्क

Share:
Main Image
Last updated: 09-Feb-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - एरवी धरणाचे पाणी व प्रशासकीय कामांच्या व्यापात व्यस्त असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी शिर्डीत एक वेगळीच मैफल सजवली. राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी व महाराष्ट्राच्या लोकधारेच्या दर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.

साईबाबा संस्थानच्या शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात गेल्या दोन दिवसांपासून या स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ आपल्या कामातच नव्हे, तर कलेतही आपण निपुण असल्याचे सिद्ध केले. काहींनी शास्त्रीय संगीताचा गंभीर सूर लावला, तर काहींनी जुन्या-नव्या हिंदी-मराठी गाण्यांची बहारदार मेजवानी दिली. विशेष म्हणजे, या मंचावर महाराष्ट्राच्या अस्सल लोकधारेचा जागर पाहायला मिळाला. 'कडक लक्ष्मी' व महाराष्ट्राची परंपरा असलेल्या 'गोंधळी' नृत्याने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. 

पहिल्या दिवशी सादर झालेल्या विविध नाट्य कलाकृतींमधूनही महाराष्ट्राचा समृद्ध वारसा दिसून आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील या सुप्त गुणांना मनापासून दाद दिली. 

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले ते 'राम जी की निकली सवारी' हे नृत्य ! या सादरीकरणाने संपूर्ण सभागृहाचे वातावरण भक्तीमय व राममय करून सोडले. तसेच इतर राज्यांतील संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या नृत्यांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रशासकीय सेवेतील शिस्त सांभाळतानाच आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या दिमाखदार स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.