ऑनलाईन साडी मागवली अन् आली जुनी फाटकी सलवार... ग्राहकानं मग...

Share:
Main Image
Last updated: 08-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शॉपिंगचे आकर्षण वाढत असले, तरी फसवणुकीच्या घटनांतही मोठी वाढ झाली आहे. एका जागरूक ग्राहकाने दाखवलेला संयम आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनामुळे 'मेशो' (Meesho) कडून झालेली फसवणूक उघडकीस आली असून, ग्राहकाला त्याचे पैसे परत मिळाले आहेत.

नेमकी घटना काय?
पुण्यातील एका ग्राहकाने 'मेशो' या ऑनलाईन पोर्टलवरून साडी खरेदी केली होती. मात्र, पार्सल उघडले असता त्यात साडीऐवजी एक जुनी आणि फाटलेली सलवार आढळून आली. ग्राहकाने तात्काळ फोटो काढून वस्तू परत (Return) करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक त्रुटी दाखवून 'रिटर्न रिक्वेस्ट' नाकारली जात होती. कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधूनही ४८ तासांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ग्राहकाने ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली.

अशी केली तक्रार...
ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली खालील पावले उचलण्यात आली:
 * नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन: १९१५ वर कॉल करून तक्रार नोंदवली.
 * ई-मेलद्वारे तक्रार: कंपनीच्या अधिकृत ई-मेलवर (query@meesho.com) पुराव्यासह पत्र पाठवले.
 * CCPA कडे मागणी: या कंपनीचे खाते बंद करण्याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (com-ccpa@nic.in) ई-मेल केला.
 * सायबर फ्रॉड: फसवणूक झाल्याने १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावरही नोंद केली.

परिणाम: या पाठपुराव्यामुळे मेशो कंपनीला आपली चूक मान्य करावी लागली आणि ग्राहकाचे ४८२ रुपये पूर्णपणे परत मिळाले.

ग्राहकांसाठी सल्ला
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी आवाहन केले आहे की, ऑनलाईन फसवणूक झाल्यास डगमगून न जाता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. वस्तू उघडतानाचा व्हिडिओ बनवणे (Unboxing Video) हा सर्वात मोठा पुरावा ठरतो.

मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क
फसवणूक झालेल्या ग्राहकांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत मार्गदर्शन करते. अधिक माहितीसाठी www.abgpindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ९४२२५०२३१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पंचायतीचे विजय सागर यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.