नाशिकमध्ये दोन तरुणींवर बलात्कार... व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही...

Share:
Last updated: 07-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणींवर बलात्कार करण्यात आला, तर भगूर परिसरात एका विवाहितेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी, अंबड आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​प्रकरण १: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, नंतर फोटो व्हायरल
​पहिली घटना पंचवटी परिसरात घडली आहे. येथील एका २३ वर्षीय पीडित युवतीचे मुंबईतील घाटकोपर येथील आर्यन धर्मेंद्र शहा याच्याशी प्रेमसंबंध होते. संशयिताने २०२३ पासून लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे तर त्याने पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले होते. जेव्हा तरुणीने लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने नकार दिला. त्यानंतर पीडितेचा विवाह दुसऱ्या तरुणाशी ठरला असता, संशयित आर्यनने पीडितेच्या होणाऱ्या पतीला आणि नातेवाईकांना सोशल मीडियावरून अश्लील फोटो पाठवून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

​प्रकरण २: हॉटेलमध्ये नेऊन तरुणीची फसवणूक
​दुसरी घटना अंबड औद्योगिक वसाहत परिसरात घडली आहे. शैलेश नावाच्या एका तरुणाने पीडित तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे स्वप्न दाखवले. गेल्या बुधवारी (दि. ४) संशयिताने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे दोन दिवस मुक्काम करून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक निरीक्षक रौंदळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

​प्रकरण ३: विवाहितेचा विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ
​तिसरी घटना भगूर (देवळाली कॅम्प) येथे घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी एक विवाहित महिला तुलसा लॉन्स भागातून पायी जात असताना, सुनील आनंदा शिंदे (रा. भगूर) याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता संशयिताने तिला "तुझी मुले माझे काय करणार?" अशी दमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी विनयभंग व अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम अधिक तपास करत आहेत.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे शहरात संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.