मुंबई, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता त्यांच्या पत्नी आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली आहे. या निर्णयामुळे अजितदादांनी सुरू केलेली विकासाची कामे आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीडच्या पालकत्त्वाचा पेच सुटला
आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त होते. त्यावेळी अजित पवार यांनी हे पद कोणाकडेही न सोपवता स्वतःकडे ठेवले होते. बीडमधील प्रशासकीय घडी बसवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले होते. दादांच्या निधनानंतर बीडचा 'पालक' कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, सरकारने सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवत ही धुरा त्यांच्याकडे सोपवली आहे.
पुण्याचे नेतृत्व 'पवार' कुटुंबाकडेच
पुणे जिल्हा हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आणि जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. पुण्याच्या विकासकामांवर दादांची घट्ट पकड होती. आता उपमुख्यमंत्री पदासोबतच पुण्याचे पालकमंत्रिपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे पवार कुटुंबाच्याच हाती राहणार आहेत.
ठळक वैशिष्ट्ये:
मंत्रिमंडळाचा विस्तार: उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अर्थ खाते वगळता अजितदादांकडील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही खाती आधीच सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत.
प्रशासकीय गती: दोन्ही जिल्ह्यांतील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असेल.
राजकीय वारसा: ९ फेब्रुवारीपासून सुनेत्रा पवार मंत्रालयातील आपल्या दालनातून कामाला सुरुवात करणार असून, दादांच्या समर्थकांमध्ये या नियुक्तीमुळे समाधानाचे वातावरण आहे.