ही पंचक्रोशी होणार भारनियमनमुक्त... शेतीला दिवसा वीजही मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 03-Feb-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - वरवंडी येथील सौरऊर्जा प्रकल्प आणि शिबलापूर येथील नव्या वीज उपकेंद्रामुळे आश्वी परिसरातील गावांना आता दिवसा वीज उपलब्ध होणार असून, ही गावे कायमची भारनियमनमुक्त होतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी आश्वी खुर्द, दाढ खुर्द व झरेकाठी या गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

महिन्याभरात प्रकल्प कार्यान्वित होणार
वरवंडी येथे सुमारे २० केव्ही क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात ते पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे दाढ खुर्द, चणेगाव, आश्वी खुर्द, शिबलापूर, पानोडी, आश्वी बुद्रूक, उंबरी, शेडगाव, हंगेवाडी या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शिबलापूर येथील ५ केव्ही उपकेंद्रामुळे विजेचा दाब (Voltage) सुधारण्यास मदत होईल.

जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे निर्णय
कालवे अतिक्रमणमुक्त होणार: पाण्याचे वहन वाढवण्यासाठी कालव्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे काढली जाणार आहेत. यात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
१५० कोटींचा निधी: प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी जलसंपदा विभागाने १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
निळवंडेचा लाभ: निळवंडे धरणाचे पाणी वंचित गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक माहिती सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र
केंद्राच्या अर्थसंकल्पात युवकांच्या रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीत (MIDC) येणाऱ्या उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आश्वी भागात कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी 'थर्मल ड्रोन'
वाढत्या बिबट्यांच्या दहशतीबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, "वन विभागाला ९ कोटी रुपयांचा अत्याधुनिक निधी दिला आहे. थर्मल ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्यांचे अचूक लोकेशन शोधून त्यांना जेरबंद करणे आता सोपे झाले आहे."

Advertisement

Comments

No comments yet.