राज्यात पुन्हा पावसाचा अलर्ट... फेब्रुवारीत थंडीचा असा आहे अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 01-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - महाराष्ट्रात उद्या सोमवारपासून हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (भारतीय हवामान खाते, पुणे) यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहून दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा जाणवणार असल्याचे चिन्हे आहेत.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशात पाऊस?
सोमवार (दि. २) ते बुधवार (दि. ४) या कालावधीत नाशिक, नगर आणि खान्देशातील काही तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. यामध्ये प्रामुख्याने संगमनेर, अकोला, कोपरगाव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर या भागाचा समावेश आहे. या परिसरात केवळ ढगाळ वातावरण असेल किंवा काही ठिकाणी २ ते ४ मिमी इतका अतिशय किरकोळ पाऊस पडू शकतो. ५ फेब्रुवारीपासून हवामान पुन्हा कोरडे होईल.

थंडी गायब, रात्रीचा उकाडा वाढणार
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर ओसरलेला दिसेल. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहणार असल्याने रात्रीचा उकाडा जाणवेल. उर्वरित २३ जिल्ह्यांत मात्र माफक थंडी कायम राहील. संपूर्ण फेब्रुवारीचा विचार करता, मुंबईसह कोकण, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमीच राहण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब: सिंचनाची गरज वाढणार
नाशिक आणि अहिल्यानगर (नगर) हे दोन जिल्हे वगळता, उर्वरित महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. दुपारी ३ च्या सुमारास उन्हाचा चटका तीव्र असेल. यामुळे जमिनीतील ओलावा लवकर कमी होऊन रब्बी पिकांना सिंचनाच्या जादा फेऱ्या (आवर्तने) द्याव्या लागू शकतात, असा सल्लाही देण्यात आला आहे.

पावसाची स्थिती काय?
यंदाचा फेब्रुवारी महिना बहुतांश जिल्ह्यांसाठी कोरडाच जाण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर आणि भंडारा या ६ जिल्ह्यांत केवळ १० मिमी पर्यंत किरकोळ पावसाची (पेंडकळवणी) शक्यता आहे. रब्बी पिकांसाठी ही स्थिती काही अंशी फायदेशीर मानली जात आहे.

म्हणून महाराष्ट्रात पाऊस 

 नेहमी जम्मू काश्मीर, लेह लडाख ह्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रक्षोभ सध्या ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जातांना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देश सह  सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यन्त पोहोचले आहे. शिवाय ह्या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे, बं. उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता ह्या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देश सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगाचे सावट आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.