नाशिक, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाढत्या वाहनसंख्येसोबतच बेशिस्त ड्रायव्हिंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. खुटवडनगर भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका मालवाहू पिकअपने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मीनाताई ठाकरे शाळेसमोर अपघात
सोनाली तुलसीदास राठोड (४५, रा. वैष्णव भक्ती अपार्टमेन्ट, मरिमाता मंदिराजवळ, कामटवाडा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली राठोड या शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी आपल्या दुचाकीवरून सिडकोच्या दिशेने जात होत्या.
माऊली लॉन्सकडून त्रिमूर्ती चौकाकडे जात असताना, मिनाताई ठाकरे शाळेसमोर पाठीमागून आलेल्या मालवाहू पिकअपने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत सोनाली राठोड या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे कामटवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची थोडक्यात माहिती:
मयत: सोनाली तुलसीदास राठोड (वय ४५)
अपघात स्थळ: मिनाताई ठाकरे शाळेसमोर, खुटवडनगर.
वाहन क्रमांक: पिकअप (MH 15 GV 4135)
कारवाई: अंबड पोलिसांत घटनेची नोंद, अधिक तपास सुरू.
नाशिक : अंबड गावात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात २० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभावती शरद जाधव (रा.गायत्री मेडिकल जवळ,अंबडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव कुटूंबिय गुरूवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. र्अात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून डब्यात टेवलेली २० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३० हजार ९२० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार साळवे करीत आहेत.