मुंबई, (प्रतिनिधी) ३१ जानेवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. "राष्ट्रवादीसारख्या अस्सल मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा, कोणीही पाटील चालेल, पण पटेल नको," असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे.
राजकारणाचा विचका झालाय; राज ठाकरेंची टीका
राज ठाकरे यांनी 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. "महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे, त्यावर भाष्यही करावेसे वाटत नाही. पण तरीही सध्याच्या घडामोडींवर बोलणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रांगड्या मातीतला पक्ष आहे, त्यामुळे त्याचे नेतृत्व मराठी माणसाकडेच असायला हवे," असे त्यांनी म्हटले आहे.
प्रफुल्ल पटेलांच्या नावावर आक्षेप?
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पटेल सध्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी 'पटेल नको' असे स्पष्टपणे नमूद केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याने त्या पक्षसंघटनेला पूर्ण वेळ देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा स्थितीत पटेलांच्या नावावर पक्षातील अंतर्गत गट काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण
दुसरीकडे, अजित पवार गटाचे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत विलीनीकरण होणार का? किंवा पक्षाला नवीन मराठी चेहरा अध्यक्ष म्हणून मिळणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज ठाकरे यांच्या या 'मराठी कार्ड'मुळे राष्ट्रवादीच्या आगामी अध्यक्ष निवडीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.