राष्ट्रवादीची धुरा कुणाकडे जाणार? उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार?

Share:
Main Image
Last updated: 29-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २९ जानेवारी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजितदादांनंतर पक्षाचे नेतृत्व कोण करणार आणि रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा कठीण प्रसंगी खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नेतृत्वासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा सूर
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत कार्यकर्त्यांचा धीर टिकवून ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय नसल्याचे पक्षातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या होत्या. जरी त्यांच्या अनुभवावर सुरुवातीला काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असले, तरी सध्याच्या आणीबाणीच्या काळात पक्षाची धुरा त्यांच्याच हाती द्यावी, असा सूर उमटत आहे.

एकीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक?
काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. शरद पवार यांच्या वाढत्या वयामुळे भविष्यात अजित पवार हेच या संयुक्त पक्षाचे प्रमुख नेते असतील, असे गणित मांडले जात होते. मात्र, दादांच्या अचानक जाण्याने ही सर्व गणिते विस्कटली आहेत. आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्षाच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रालयाचा यक्षप्रश्न
विधिमंडळात ४१ आमदारांचे बळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य सरकारमध्ये मोठा दबदबा होता. अजितदादांकडे उपमुख्यमंत्रिपदासह राज्याचे महत्त्वाचे अर्थमंत्रालयही होते. आता ही महत्त्वाची पदे कोणाकडे द्यायची, असा मोठा प्रश्न सरकारसमोर उभा आहे. मंत्रिमंडळात पवार घराण्यातील एकही व्यक्ती नसेल, तर पक्षावरची पकड ढिली होईल का, अशी भीती पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सतावत आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'दमदार आणि दिलदार' नेतृत्व हरपले असल्याची भावना व्यक्त होत असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील प्रवासाची सूत्रे नक्की कोणाच्या हाती जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Advertisement

Comments

No comments yet.