पुणे, (प्रतिनिधी) २८ जानेवारी - महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे आज सकाळी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचे खासगी विमान कोसळून हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे मुंबईहून एका महत्त्वाच्या बैठकीसाठी बारामतीच्या दिशेने निघाले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास त्यांचे विमान बारामती धावपट्टीच्या जवळ आले असता, तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीच्या काही अंतरावरच जमिनीवर आदळले आणि त्याला भीषण आग लागली.
बचावकार्य आणि अधिकृत माहिती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीची तीव्रता एवढी भीषण होती की विमानाचा अक्षरशः कोळसा झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील अन्य काही सहकाऱ्यांचा आणि वैमानिकांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे 'दादा' हरपले
अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि 'पॉवरफुल' नेते म्हणून ओळखले जात होते. सलग सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे ते राज्यातील एकमेव नेते होते. प्रशासनावरील पकड आणि कामाचा उरक यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेससह महायुती आणि संपूर्ण राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
चौकट
विमान अपघातात अजित पवार यांच्या सह सहा जणांचा मृत्यू
विमान कोसळल्यानंतर पेट घेतला
मुंबईहून बारामतीमध्ये सभा घेण्यासाठी अजित पवार पोहोचले होते
लँडिंग वेळी विमान कोसळले