त्र्यंबकेश्वरसह देशातील १० शहरांमध्ये झाला हा यशस्वी प्रयोग...

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - शहरी भागातील पर्यावरणीय आव्हानांवर मात करण्यासाठी भारतीय 'क्लायमेट-टेक' (Climate-Tech) स्टार्टअप्सनी मोठी झेप घेतली आहे. 'सोशल अल्फा' (Social Alpha) आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो इंडिया फाउंडेशन' (UTIF) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या 'इनोव्हेशन्स इन सस्टेनेबल अर्बन ट्रान्झिशन प्रोग्राम' अंतर्गत देशातील नऊ स्टार्टअप्सनी १० शहरांमध्ये १८ प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. अवघ्या सहा महिन्यांत या प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल १०८.८९ टन (सुमारे १०९ टन) कार्बन डायऑक्साइड समतुल्य (CO2e) उत्सर्जनात घट करण्यात आली आहे.

पाणी बचत आणि स्वच्छ ऊर्जेत मोठे यश

कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या तंत्रज्ञानाचा शहरी सेवेत कसा वापर करता येईल, हे दाखवून देण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसोबत १७ भागीदारी करण्यात आल्या. सहा महिन्यांच्या कालावधीत १४३ टन कचऱ्याचे व्यवस्थापन, ६४.३१ किलोलिटर पाण्याची बचत, १२६० किलोलिटर सांडपाण्यावर सुरक्षित प्रक्रिया आणि ६,९६३ किलोवॅट-तास (kWh) अक्षय ऊर्जेची निर्मिती करण्यात आली आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सांडपाण्यावर प्रक्रिया

या उपक्रमात महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई आणि पुणे या शहरांचाही समावेश आहे. 'एक्सप्रेडिक्ट लॅब्स' (Xpredict Labs) या स्टार्टअपने नाशिकमधील 'यशपॉली'च्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतेही बाह्य रसायन न वापरता चालणारी इलेक्ट्रोकेमिकल यंत्रणा कार्यान्वित केली. या प्रकल्पातून सुमारे १,२६० किलोलिटर पाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आली.

इतर स्टार्टअप्सची उल्लेखनीय कामगिरी

 * बांधकाम क्षेत्रात सिमेंटला पर्याय: 'कार्बन स्ट्रॉंग'ने हैदराबादमध्ये फ्लाय-अॅश आधारित बाईंडर वापरून सिमेंटचा वापर ३४.८ टक्क्यांनी कमी केला आणि ४६.७४ टन उत्सर्जन घटवले. तर 'सतीक काँक्रीट'ने नवी दिल्ली आणि चेन्नईत रस्ते बांधकामात कचऱ्यापासून बनवलेले बाईंडर वापरून १८.५ टन उत्सर्जन कमी केले.

 * प्लास्टिकमुक्त पॅकेजिंग: 'गो डू गुड स्टुडिओ'ने मुंबई, पुणे आणि हैदराबादमध्ये १.५ लाख कंपोस्टेबल फूड पॅकेजिंग युनिट्स वितरित करून सुमारे १.५ टन प्लास्टिकला पर्याय दिला व २६ टन उत्सर्जन वाचवले.

 * अक्षय ऊर्जा आणि सोलर कोटिंग: 'ट्रिनॅनो टेक्नॉलॉजीज'ने मुंबई महापालिकेच्या दोन शाळांमधील सोलर पॅनेल्सवर विशेष नॅनो-कोटिंग करून वीजनिर्मितीत ६.९ टक्क्यांची वाढ मिळवली. तर 'अपेरो एनर्जी'ने भावनगरमध्ये पवन-सौर हायब्रीड मायक्रोग्रीड उभारले.

 * कचऱ्यातून बायोगॅस आणि पाणी संवर्धन: 'विविफिका सस्टेनेबल सोल्युशन्स'ने कोझिकोडमधील रुग्णालयात दररोज ५०० किलो अन्नकचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला. 'स्मार्ट टेरा'ने चेन्नई आणि खम्मम येथे पाणी गळतीचे प्रमाण कमी केले, तर 'वायुजल टेक्नॉलॉजीज'ने हवेतून २१,००० लिटर शुद्ध पिण्याचे पाणी तयार केले.

शहरी विकासासाठी नवा मार्ग

भारतातील ७,००० हून अधिक शहरांच्या शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि संस्थात्मक पाठबळाची जोड कशी उपयुक्त ठरू शकते, हे या प्रयोगातून सिद्ध झाले असल्याचे 'सोशल अल्फा'चे व्यवस्थापकीय संचालक एल. सी. दास आणि 'यूटीआयएफ'च्या संचालक गौरवी लोबो यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाने या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केल्यास भविष्यात शहरी प्रदूषणावर मोठे नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

Comments

No comments yet.