अहो आश्चर्यम... हे कुठले गार्डन नाही तर आहे चक्क...

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

 

सोलापूर, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - एखाद्या पर्यटनस्थळाची किंवा सुंदर बगीच्याची अनुभूती देणारा हा परिसर म्हणजे कोणतेही उद्यान नसून, चक्क सोलापूरचे एसटी बसस्थानक आहे. दृढ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची जिद्द असेल, तर कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवून आणता येते, याचा प्रत्यय सोलापूर बसस्थानकाच्या या बदललेल्या रूपामुळे आला आहे. काही दिवसांपूर्वी अस्वच्छता आणि असुविधांनी वेढलेल्या या बसस्थानकाचा स्थानिक प्रशासनाने अवघ्या काही दिवसांत कायापालट केला असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनीही या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाला अचानक भेट दिली होती. त्यावेळी बसस्थानकातील अस्वच्छता आणि प्रवाशांची गैरसोय पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. निधी किंवा साधनांचे कारण न देता केवळ इच्छाशक्तीच्या बळावर परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणता येतो, असा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.

मंत्र्यांच्या या सूचनेची स्थानिक एसटी प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत तातडीने कामाला सुरुवात केली. यातून आता सोलापूर बसस्थानकाचे संपूर्ण रूप पालटले आहे. बसस्थानकाच्या भिंतींवर सोलापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैभवशाली वारशाची आकर्षक चित्रे साकारण्यात आली आहेत. या बोलक्या चित्रांमुळे बसस्थानकाचा परिसर अत्यंत सुंदर, प्रसन्न आणि देखणा दिसू लागला असून, प्रवाशांनाही सोलापूरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा अनुभवता येत आहे.

विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या भेटीनंतर केवळ तात्पुरत्या स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, बसस्थानकाचा संपूर्ण परिसर प्रवाशांसाठी आनंददायी करण्याचा ध्यास स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला. या सकारात्मक बदलाची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर एसटी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. वरिष्ठांच्या सूचनांना केवळ सरकारी आदेश म्हणून न पाहता, त्यातून प्रत्यक्ष कामात बदल घडवून आणण्याची अधिकाऱ्यांची भूमिका खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोलापूर बसस्थानकातील हा नवा प्रयोग राज्यातील इतर एसटी बसस्थानकांसाठीही एक आदर्श आणि प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. इच्छाशक्ती असेल तर कोणतेही परिवर्तन अशक्य नाही, हे सोलापूरच्या एसटी प्रशासनाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

Comments

No comments yet.