या वर्षीचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार या दिग्गज व्यक्तीला जाहीर.. पुण्यात होणार विशेष समारंभ...

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

 

मुंबई/पुणे/नाशिक, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार शनिवार, दि.२८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने  देण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.  

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ माजी  मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ.तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, ज्येष्ठ विचारवंत सुखदेव थोरात, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ विचारवंत, लेखक, कवी जावेद अख्तर यांची निवड करण्यात आली आहे. जावेद अख्तर यांनी भारतीय साहित्य, चित्रपटसृष्टी आणि सामाजिक विचारविश्व या सर्व क्षेत्रांत आपल्या प्रखर लेखणीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सन १९७० च्या दशकात सलीम खान यांच्यासोबत त्यांनी सलीम-जावेद ही सुवर्ण जोडी तयार केली. शोले, दीवार, जंजीर, त्रिशूल, डॉन यांसारख्या चित्रपटांच्या कथा व संवादांतून सामान्य माणसाचा संघर्ष आणि अन्यायाविरुद्धचा आवाज त्यांनी प्रखरपणे मांडला. गीतकार म्हणून त्यांनी १९४२ ए लव्ह स्टोरी, दिल चाहता है, लगान, कल हो ना हो, भाग मिल्खा भाग यासह अनेक चित्रपटांना अविस्मरणीय गीते दिली. त्यांच्या गीतांमध्ये भावना आणि विचार यांचा समतोल दिसतो. सौंदर्य, सत्य आणि मानवता यांचा संगम आहे. चित्रपटांपलीकडे जावेद अख्तर यांनी धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समता, सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसाठी सतत आवाज उठवला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांशी ते एकनिष्ठ आहेत.

साहित्य आणि कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांचे कवितासंग्रह तरकीबी लैब, तर्कश, लावा हे आजही विचारप्रवर्तक मानले जातात. जावेद अख्तर एक संवेदनशील कवी, विचारशील लेखक आणि समाजमनाला दिशा देणारे कलावंत आहे. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२६ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व फुले प्रेमी, समता सैनिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Comments

No comments yet.