ऑनलाईन डेस्क, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - आयुष्यात कधी कोणत्या वळणावर नशिबाचे फासे पलटतील, याचा काही नेम नसतो. केरळमधील एका स्थानिक निवडणुकीत अवघ्या १३ मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या एका महिलेवर कॅनडात तब्बल ३२ कोटी रुपयांची (५० लाख कॅनेडियन डॉलर) लॉटरी लागली आहे. मूळची केरळची असलेली आणि सध्या कॅनडातील एडमंटन येथे वास्तव्यास असलेली स्नेहा जॉय ही या जॅकपॉटची मानकरी ठरली असून, तिच्या या अनपेक्षित यशाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
कोण आहे स्नेहा जॉय?
स्नेहा जॉय मूळची केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वेंगूर येथील रहिवासी आहे. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असून, तिचे वडील पी. पी. जॉय हे वेंगूर भागातील काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत, तर आईचे नाव जॉली जॉय आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्नेहाने अभियांत्रिकी क्षेत्रातही काम केले होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी ती तिचे पती विजिल वर्गीस यांच्यासोबत कॅनडातील एडमंटन शहरात स्थायिक झाली. विजिल हे मूळचे केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील निलांबूर येथील रहिवासी आहेत.
अवघ्या १३ मतांनी हुकला होता विजयाचा घास
कॅनडात स्थायिक होण्यापूर्वी स्नेहा केरळमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होती. २०२० मध्ये तिने वेंगूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या (UDF) तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत तिला अवघ्या १३ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या अल्पशा मतांच्या फरकाने तिचा राजकीय प्रवास वेगळ्या वळणावर गेला; पण काही वर्षांनंतर परदेशात नशिबाने तिला भरभरून साथ दिली.
लॉटरीची रक्कम हाती आल्यानंतर तीन शब्दांत भावना
२१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ‘लोटो ६/४९ क्लासिक’ (Lotto 6/49 Classic) सोडतीत स्नेहाने सर्व सहा अचूक क्रमांक जुळवून तब्बल ५० लाख कॅनेडियन डॉलरचा जॅकपॉट जिंकला. आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेस्टर्न कॅनडा लॉटरी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी तिला पारितोषिकाची रक्कम सुपूर्द केली.
इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर सुरुवातीला आपल्याला धक्काच बसल्याचे स्नेहाने सांगितले. तिने आपल्या भावना केवळ तीन शब्दांत व्यक्त केल्या— ‘चकित, आनंदी आणि दिलासा’ (Shock, Happy, Relief).
३२ कोटींच्या रकमेचे काय करणार नियोजन?
एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर तात्काळ महागड्या वस्तू किंवा विलासी गोष्टींवर खर्च करण्याऐवजी तिने आपल्या जबाबदाऱ्या आणि स्वप्नांना प्राधान्य दिले आहे. सर्वात आधी ती आपले गृहकर्ज फेडणार आहे. त्यानंतर संपूर्ण जग फिरण्याची तिची इच्छा असून, जिंकलेल्या रकमेतील काही हिस्सा ती आपल्या कुटुंबासोबत वाटून घेणार आहे.
स्नेहाच्या या भरघोस यशाची बातमी समजताच केरळमधील तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकेकाळी १३ मतांनी निवडणूक हरलेल्या स्नेहाने आज ३२ कोटींचा जॅकपॉट जिंकून नशिबाची वेगळीच बाजू अनुभवली आहे.