रामकुंड परिसरातील गांधी तलावाचे नाव बदलणार? पण का? नवीन नाव काय असणार?

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक ‘गांधी तलाव’चे नाव बदलण्याचा प्रयत्न म्हणजे नाशिकच्या आणि देशाच्या ऐतिहासिक वारशाशी केलेली छेडछाड आहे. महात्मा गांधी यांचे नाव बदलून त्यांचे विचार कधीही संपणार नाहीत, त्यामुळे गांधी तलावाचे नाव कायम ठेवावे, अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉम्रेड राजू देसले आणि संविधानप्रेमी नाशिककर चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या तलावाची ऐतिहासिक ओळख अधिक ठळक करून सुशोभीकरणाद्वारे नाशिकच्या पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रीय स्मृतीचे प्रतीक

नाशिकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेला गांधी तलाव हा केवळ पाण्याचा साठा नसून राष्ट्रीय स्मृतीचा अविभाज्य भाग असल्याचे देसले यांनी नमूद केले आहे. महात्मा गांधी यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन करण्यात आले होते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या तलावाजवळ संगमरवरी स्मारक उभारण्यात आले. तेव्हापासून या परिसराला ‘गांधी तलाव’ म्हणून ओळखले जाते. आज काही घटकांकडून या तलावाचे नाव बदलण्याची मागणी केली जात असून, महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या विचारसरणीच्या वारसदारांकडून होत असलेला हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.

नामांतराच्या राजकारणावर टीका

या मुद्द्यावरून सत्ताधारी विचारसरणीवर टीका करताना कॉम्रेड देसले म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान परदेशात गेल्यावर भारत हा गांधीजींचा देश असल्याचे अभिमानाने सांगतात आणि त्यांच्या विचारांचा गौरव करतात; तर दुसरीकडे त्याच विचारसरणीचे लोक देशात गांधीजींचे नाव पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, ही स्पष्ट दुटप्पी भूमिका आहे. इतिहास पुसून कधीही नवीन इतिहास निर्माण करता येत नाही. त्यामुळे नामांतराच्या राजकारणात वेळ आणि सार्वजनिक पैसा वाया घालवण्याऐवजी नाशिकच्या विकासावर आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकासाची मागणी

आगामी कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातील लाखो भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गांधी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ही संधी साधून प्रशासनाने तलावाची ऐतिहासिक ओळख अधिक ठळक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या परिसरात महात्मा गांधी यांचे स्मारक आणि तलावाचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे माहिती फलक लावावेत, स्वच्छता व आकर्षक सुशोभीकरण करून योग्य पर्यटन सुविधा विकसित कराव्यात. यामुळे येणाऱ्या पर्यटकांना या वारशाची माहिती मिळेल आणि नाशिकच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असेही देसले यांनी स्पष्ट केले.

नाशिक महानगरपालिका आणि कुंभमेळा प्राधिकरणाने नामांतराचे राजकारण बाजूला ठेवून गांधी तलावाचे नाव कायम राखावे व या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे, अशी मागणी भाकप आणि परिवर्तनवादी चळवळीने केली आहे.

 

Comments

No comments yet.