इन्स्टाग्रामवर रिल्स पाहिले... 'फेअरनेस क्रीम' वापरले...  तरुणीची किडनी धोक्यात...

Share:
Main Image
Last updated: 25-Nov-2026

ऑनलाईन डेस्क, (प्रतिनिधी) २५ नोव्हेंबर - सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींना भुलून अनधिकृत सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे जीवावर कसे बेतू शकते, याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये समोर आला आहे. मुरुमे, काळे डाग आणि पिग्मेंटेशन दूर करून त्वचा उजळवण्याचा दावा करणाऱ्या एका फेअरनेस क्रीमच्या वापरामुळे मलप्पुरम जिल्ह्यातील अरीकोड येथील १७ वर्षीय तरुणीला गंभीर किडनी विकाराचा सामना करावा लागत आहे. या क्रीममध्ये विषारी 'पारा' (मर्क्युरी) निर्धारित मर्यादेपेक्षा तब्बल १२,५०० पट अधिक प्रमाणात असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत उघड झाले आहे.

नेमके प्रकरण काय?

संबंधित तरुणीने इन्स्टाग्रामवर जाहिरात पाहिलेले एक फेअरनेस क्रीम सुमारे वर्षभर नियमित वापरले होते. काही काळानंतर तिला पायांवर सूज येणे, वारंवार भोवळ येणे आणि रक्तदाब धोकादायकरीत्या कमी होणे अशी लक्षणे जाणवू लागली. वैद्यकीय तपासणीत तिला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी' (Membranous Nephropathy) हा किडनीचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. तिच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण अत्यंत वाढलेले आढळले. त्यानंतर तिने वापरलेल्या क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल १२,५०० पीपीएम (parts per million) इतका पारा असल्याचे समोर आले. भारतात सौंदर्यप्रसाधनांमध्ये पाऱ्याची कायदेशीर मर्यादा केवळ १ पीपीएम इतकीच आहे.

पारा शरीरात कसा जातो आणि किडनीला कसा धोका पोहोचतो?

फेअरनेस क्रीममध्ये त्वचेला रंग देणाऱ्या 'मेलॅनिन'ची निर्मिती थांबवण्यासाठी आणि संरक्षक (Preservative) म्हणून पाऱ्याचा वापर केला जातो. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. डी. एम. महाजन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मते, पारायुक्त क्रीम वारंवार लावल्याने ते त्वचेद्वारे शोषले जाऊन रक्तात मिसळते. याशिवाय ओठांवरून चुकून तोंडात जाणे किंवा डोळ्यांच्या संपर्कातूनही पारा शरीरात पोहोचू शकतो.

किडनीतील सूक्ष्म गाळणी यंत्रणेला (ग्लोमेरूली) पाऱ्यामुळे इजा पोहोचते. त्यामुळे 'नेफ्रोटिक सिंड्रोम' उद्भवतो आणि शरीरातील आवश्यक प्रथिने लघवीवाटे बाहेर फेकली जातात. वेळेवर उपचार न झाल्यास किडनी कायमस्वरूपी निकामी (Renal Failure) होण्याचा धोका असतो. केवळ किडनीच नव्हे, तर पाऱ्याच्या दीर्घकालीन संपर्कामुळे मज्जासंस्थेवरही गंभीर परिणाम होतो. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांची मज्जासंस्था विकसित होण्याच्या टप्प्यात असल्याने त्यांना सर्वाधिक धोका असतो.

ऑनलाइन बाजारात विषारी क्रीम्सचा सुळसुळाट

ही केवळ एकच घटना नसून समस्या अत्यंत गंभीर असल्याचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अहवालांतून स्पष्ट झाले आहे. 'झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुप'ने (ZMWG) तपासलेल्या ३१ फेअरनेस क्रीम्सपैकी २५ क्रीम्समध्ये मर्यादेपेक्षा हजारो पट अधिक पारा आढळला. तर भारतातील 'टॉक्सिक्स लिंक' या संस्थेने भारत, पाकिस्तान आणि थायलंडमध्ये तयार झालेल्या ८ क्रीम्सची तपासणी केली असता, ७ नमुन्यांमध्ये ७,३३१ ते २७,४३१ पीपीएम इतका पारा आढळला. संघटित क्षेत्रातील भारतीय ब्रँड्स नियमांचे पालन करतात, मात्र ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर परदेशी आणि असंघटित क्षेत्रातील विषारी क्रीम्सची सर्रास विक्री होणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे 'टॉक्सिक्स लिंक'चे असोसिएट डायरेक्टर सतीश सिन्हा यांनी म्हटले आहे.

'ही' लक्षणे दिसल्यास तात्काळ सावध व्हा

पाऱ्याच्या विषबाधेची लक्षणे लगेच न दिसता काही महिन्यांनी समोर येतात. फेअरनेस क्रीम वापरणाऱ्यांनी खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये:

 * किडनी विकाराची लक्षणे: डोळ्यांभोवती, चेहऱ्यावर किंवा पायांवर सूज येणे, लघवीला नेहमीपेक्षा जास्त फेस येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, शरीरात पाणी साचल्याने अचानक वजन वाढणे आणि सतत थकवा जाणवणे.

 * इतर लक्षणे: हातपाय थरथरणे, चिडचिडेपणा, स्मरणशक्ती व एकाग्रतेचा अभाव, तोंडात फोड येणे आणि त्वचेला खाज सुटणे.

ग्राहकांनी कशी ओळख करावी?

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना लेबलवरील घटक तपासण्याचा सल्ला दिला आहे. पॅकवर Mercury, Mercuric, Mercurous chloride, Calomel, Mercuric oxide, Cinnabaris, Hydrargyri oxydum rubrum किंवा Quicksilver अशी नावे असल्यास ते उत्पादन वापरू नये. तसेच, क्रीम सोने, चांदी किंवा दागिन्यांपासून दूर ठेवण्याची सूचना असल्यास त्यात पारा असण्याची दाट शक्यता असते.

अनेक अनधिकृत क्रीम्सच्या पॅकेटवर पाऱ्याचा उल्लेखच केला जात नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील झटपट गोरेपणाचे दावे करणाऱ्या जाहिरातींना बळी न पडता, त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी मान्यताप्राप्त त्वचारोग तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले आहे. तसेच कोणतीही शंका किंवा लक्षणे आढळल्यास क्रीमचा वापर तात्काळ बंद करून लघवी, रक्त आणि किडनीची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

Comments

No comments yet.