निवृत्त आरटीओ अधिकारी आत्महत्या... पोलिस तपासात समोर आली ही धक्कादायक माहिती...

Share:
Main Image
Last updated: 22-Nov-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ नोव्हेंबर - मालमत्तेच्या वादातून निवृत्त अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या न्यायालयीन वाद, धमक्या आणि आर्थिक व मानसिक छळामुळे हेमंत हेमाडे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीत नेमके काय म्हटले आहे?

या प्रकरणी योगीता हेमंत हेमाडे (रा. उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, नाशिक) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मयत हेमंत हेमाडे यांनी योगीता यांच्याशी पुनर्विवाह केला होता. कुटुंबीयांच्या मालमत्तेवरील योगीता यांचे सर्व हक्क सोडण्यासाठी तसेच हेमंत हेमाडे यांची फसवणूक करून बळकावलेली मिळकत परत मिळवण्यासाठी दाखल केलेला दावा व इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी चौघांनी वेळोवेळी दबाव आणि धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

कोणाविरुद्ध गुन्हा दाखल?

पोलिसांनी या प्रकरणी यश हेमाडे (रा. नेचरर्स ब्लिझ बिल्डिंग, नाशिक), भाग्यश्री यश हेमाडे (रा. उषाकिरण सोसायटी, उंटवाडी रोड, नाशिक), मुलगी प्रियंका कुणाल खोपकर (रा. ॲन्टॉप हिल, मुंबई) आणि यशचे सासरे मल्लिकार्जुन उमदी (रा. नाशिक) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी संगनमत करून फिर्यादी व मयत हेमंत हेमाडे यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

न्यायालयात गेल्यास जिवे मारण्याची धमकी

फिर्यादीनुसार, यापुढे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिल्यास फिर्यादी व त्यांच्या पतीसाठी तीच शेवटची तारीख असेल, अशी जिवे मारण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आली होती. त्यामुळे मालमत्तेवरील हक्क प्राप्त करण्यासाठी पती-पत्नी न्यायालयातही जाऊ शकत नव्हते. अशा प्रकारे सर्व बाजूंनी कोंडी करून आणि सतत त्रास देऊन हेमंत हेमाडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा छळाचा आणि धमकावण्याचा प्रकार ८ ऑक्टोबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२६ या दीर्घ कालावधीत सुरू होता, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, संबंधित पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

Comments

No comments yet.