वाहन विमा नसेल तर टोलनाक्यावर दंड होणार? तो येणारा मेसेज आहे तरी काय?

Share:
Main Image
Last updated: 22-Nov-2026

 

मुंबई, (प्रतिनिधी) २२ नोव्हेंबर - राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना वाहन विम्याच्या नूतनीकरणासंदर्भात पाठवले जाणारे एसएमएस (लघु संदेश सेवा) हे केवळ जनजागृती मोहिमेच्या चाचणीचा भाग असून, याच्या आधारे टोल नाक्यांवर कोणतेही चलन जारी केले जाणार नाही किंवा दंड आकारला जाणार नाही, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केले आहे.

मोटार विमा पॉलिसीच्या आठवणीसाठी उपक्रम

निवडक महामार्ग वापरकर्त्यांना पाठवले जाणारे हे संदेश पूर्णपणे माहितीपर आणि मार्गदर्शनपर असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले आहे. वाहनमालकांना त्यांच्या मोटार विमा पॉलिसीची मुदत संपण्याच्या आगामी तारखांची पूर्वसूचना देणे व आठवण करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विमा संरक्षणात खंड न पडता वाहनमालकांनी वेळेत विम्याचे नूतनीकरण करावे, असे आवाहन एनएचएआयने केले आहे.

दंडात्मक कारवाईशी संबंध नाही

काही संभाव्य संभ्रमांवर स्पष्टीकरण देताना एनएचएआयने सांगितले की, ही एसएमएस प्रणाली टोल नाक्यांवरील कोणत्याही कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाईशी जोडलेली नाही. या संदेशांमुळे टोल प्लाझावर वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

जबाबदार वाहनमालकी आणि रस्ता सुरक्षेला चालना

आगाऊ स्मरणपत्रे पाठवून जनजागृती करणे, वाहनमालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, कायदेशीर नियमांचे पालन करण्यास मदत करणे आणि सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून देशातील रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यास हातभार लागेल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

 

Comments

No comments yet.