पुणे/अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १८ नोव्हेंबर - आपल्या परखड, मिश्किल आणि अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कीर्तनादरम्यान त्यांनी तरुणाई आणि मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. "मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, त्या केवळ पैशांवर प्रेम करतात," असे धक्कादायक विधान इंदुरीकर महाराजांनी केले असून, त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमके काय म्हणाले इंदुरीकर महाराज?
कीर्तनात तरुणाईला उद्देशून बोलताना इंदुरीकर महाराजांनी प्रेम आणि पैशांचे समीकरण आपल्या खास शैलीत मांडले. ते म्हणाले की, "असे म्हणतात की ती पोरगी माझ्यावर प्रेम करते; पण तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत, त्या आधी काढून ये. पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही, पोरगी फक्त पैशावर प्रेम करते. मुलगी कधीच खरे प्रेम करत नाही, हे खरे आहे की खोटे?" असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
एवढ्यावरच न थांबता समोर बसलेल्या काही तरुणांकडे बोट दाखवत त्यांनी, "तुम्हाला तिघांनाही याचा अनुभव आलेला आहे. या तरुणाला तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे, मी खोटे बोलणार नाही," अशी मिश्किल पण थेट टिप्पणी केली. त्यामुळे कीर्तनात एकच हशा पिकला, मात्र दुसरीकडे महिला वर्गाबाबत केलेल्या या सरसकट विधानावरून नाराजीही व्यक्त केली जात आहे.
इंदुरीकर महाराजांची प्रेमाची नवी व्याख्या
या कीर्तनात महाराजांनी प्रेमाची स्वतःची अशी एक नवी व्याख्या सांगितली. ते म्हणाले की, "प्रेम वगैरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इंदुरीकरची व्याख्या सांगते की, 'लव्ह इज अ मनी अँड मनी इज अ लव्ह; मनी इज लाइफ अँड लाइफ इज अ मनी' (पैसा हेच प्रेम आहे आणि प्रेम हाच पैसा आहे; पैसा हेच जीवन आहे)." त्यांच्या या विधानाची सध्या समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मोबाईलच्या अतिवापरावरून नागरिकांना सल्ला
प्रेमाच्या विषयासोबतच इंदुरीकर महाराजांनी सध्याच्या काळातील मोबाईलच्या वाढत्या व्यसनावरही भाष्य केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे समाज भरकटत चालला असल्याचे सांगताना ते म्हणाले की, "मोबाईलमुळे लोक वेडी झाली आहेत. मोबाईल ही अत्यंत भारी वस्तू आहे, त्यामुळे तो सतत उघडा ठेवू नका," असा मोलाचा सल्लाही त्यांनी नागरिकांना आणि तरुणांना दिला. यापूर्वीही महिलांविषयी केलेल्या काही विधानांमुळे इंदुरीकर महाराज वादात अडकले होते, आता या नव्या विधानावर सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.