पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक... स्टेटसवर १२ अश्लील व्हिडीओ... पोलीस दलात खळबळ...

Share:
Main Image
Last updated: 18-Nov-2026

 

ठाणे, (प्रतिनिधी) १८ नोव्हेंबर - सामान्यांच्या सुरक्षेची आणि सायबर गुन्हे रोखण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या ठाणे पोलीस आयुक्तांचेच अधिकृत मोबाईल हॅक झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. खुद्द ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटवरून अश्लील व्हिडिओ स्टेटस ठेवण्यात आल्याने पोलीस प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात एकच खाडबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मोबाईलचा ताबा सायबर भामट्यांनी मिळवला (हॅक केला). त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सॲप अकाउंटचा गैरवापर करून त्यावर काही अश्लील व्हिडिओ स्टेटस म्हणून अपलोड करण्यात आले. आयुक्तांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या हे प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच तारांबळ उडाली. खुद्द पोलीस प्रमुखांचेच सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित राहिलेले नाही, हे समजताच पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.

सायबर पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू

या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने तातडीने सूत्रे हलवली आहेत. पोलीस आयुक्तांचा मोबाईल नेमका कसा हॅक झाला? हा हॅकिंगचा प्रकार कोणत्या देशातून किंवा ठिकाणाहून करण्यात आला? तसेच यासाठी मालवेर किंवा फिशिंग लिंकचा वापर करण्यात आला का? या सर्व बाजूंचा कसून शोध घेतला जात आहे. हॅकर्सचा माग काढण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचे काम सुरू असून, या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास यंत्रणेकडून व्यक्त होत आहे.

सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर राज्याच्या एका महत्त्वाच्या पोलीस आयुक्तांचेच मोबाईल आणि व्हॉट्सॲप अकाउंट सुरक्षित राहत नसतील, तर सामान्य जनतेच्या डिजिटल सुरक्षिततेचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. आजकाल सोशल मीडिया अकाउंट हॅक होणे, बनावट खाती तयार करणे आणि फसवणूक होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अशा वेळी यंत्रणेच्या सर्वोच्च प्रमुखासोबतच अशी घटना घडल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

थेट पोलीस आयुक्तांचे अकाउंट हॅक होणे ही केवळ एक तांत्रिक त्रुटी नसून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे. या प्रकरणात पोलीस नेमकी काय कठोर कारवाई करतात आणि सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Comments

No comments yet.