'म्हणून मराठी तरुणांना नोकरीही नाही आणि छोकरीही नाही!’... मंत्री गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य...

Share:
Main Image
Last updated: 24-Jan-2026

जळगाव, (प्रतिनिधी) २४ जानेवारी - "मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता उरलेली नाही. उत्तर भारतीय तरुण इथे येऊन कष्ट करतात, पण आपले तरुण मात्र फक्त नोकऱ्या मागत फिरतात. काम करण्याची तयारी नसल्यामुळेच आज मराठी तरुणांना नोकरीही मिळेना आणि छोकरीही मिळेना," अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील यांनी तरुणांवर तोफ डागली आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘हजार मुले कामाला लावली, ८०० सोडून पळाली’

एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, "आम्ही हजार तरुणांना नोकरीला लावले होते, त्यातील ८०० मुले काम सोडून निघून गेली. नोकऱ्या आहेत, पण त्या करण्याची मानसिकता मात्र नाही. आपण बिहारी लोकांवर टीका करतो की ते येथे येऊन पोट भरतात, पण प्रत्यक्षात ते कष्ट करायला तयार असतात. आपल्या तरुणांना मात्र कष्ट नको आहेत."

निवडणुकीचा उल्लेख करत थेट आव्हान

आपल्या विधानाचा तरुणांना राग येईल, याची जाणीव असूनही पाटील यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला. "माझ्या या वक्तव्याचा तरुणांना राग आला तर आला. आता निवडणुका थेट चार वर्षांनंतर आहेत, तेव्हा काय व्हायचे ते पाहू," असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या गणितापेक्षा वस्तुस्थिती मांडण्यावर भर दिल्याचे सांगितले.

राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता

गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. "एकीकडे सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरत असताना, दुसरीकडे जबाबदार मंत्री तरुणांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत," अशी टीका आता विरोधी पक्षांकडून केली जात आहे. विशेषतः ‘छोकरी’ संदर्भातील टिप्पणीमुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळू शकते.

Advertisement

Comments

No comments yet.