झेडपी अधिकाऱ्याच्या घरावर 'एसीबी'चा छापा... एवढी रोकड आणि सोने सापडले...

Share:
Main Image
Last updated: 05-Nov-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ५ नोव्हेंबर - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सतिष मन्सुलाल शिसोदे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईनंतर आता संपत्तीचा मोठा साठा समोर आला आहे। लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिसोदे यांच्या घराची झडती आणि बँक लॉकरची तपासणी केली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता, दागिने आणि रोकड उघडकीस आली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा परिषद वर्तुळात तसेच शासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे।

लाच प्रकरणात अटक अन् पोलीस कोठडी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक व जळगाव पथकाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी सतिष शिसोदे यांच्याविरुद्ध यशस्वी सापळा कारवाई केली होती। या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंद क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला। त्यानंतर शिसोदे यांना तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोठडीत असतानाच एसीबीच्या पथकाने त्यांच्या घराची आणि बँक लॉकरची झाडाझडती सुरू केली।

घरातून १ कोटी ४१ लाखांची संपत्ती जप्त

श्रीमती स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगाव), पोहेकॉ सुनिल वानखेडे व पोकॉ मनोज पाटील यांच्या पथकाने शिसोदे यांच्या आदर्श नगरातील स्वामी विवेकानंद सोसायटी येथील राहत्या घराची झडती घेतली। या घरझडतीमध्ये:

 * रोख रक्कम: ७ लाख ९७ हजार ९२० रुपये

 * आदर्श नगर येथील घर क्रमांक १: अंदाजे मूल्य ४५ लाख रुपये

 * आदर्श नगर येथील घर क्रमांक २: अंदाजे मूल्य ६५ लाख रुपये

 * घरातील मौल्यवान वस्तू: २४ लाख ०३९ रुपये

   अशी मिळून घराच्या झडतीत एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांची मालमत्ता समोर आली।

बँक लॉकरमध्ये सोन्या-चांदीचा खजिना

जळगाव जनता सहकारी बँकेतील शिसोदे यांच्या लॉकरची झडती पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि पथकाने घेतली असता तपास अधिकारीही थक्क झाले। लॉकरमधून कोट्यवधींचे दागिने हस्तगत करण्यात आले:

 * सोने: २५२४.१८ ग्रॅम (अडीच किलोहून अधिक) वजनाचे सोन्याचे बिस्कीट, पट्ट्या, चेन, पेंडल, लॉकेट, बांगड्या व इतर दागिन्यांचे बाजारमूल्य ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये भरले।

 * चांदी: ११,६३३.७ ग्रॅम (साडेअकरा किलोहून अधिक) वजनाच्या चांदीच्या वस्तू, लगड, बिस्कीट, वाटी, ताट यांचे मूल्य १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आढळले।

 * प्लॅटिनम: १०१.०२ ग्रॅम वजनाचे ३ लाख ५५ हजार २८६ रुपयांचे प्लॅटिनम दागिने मिळाले।

   लॉकरमधून एकट्या दागिन्यांच्या स्वरूपात एकूण ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अशा रीतीने घर आणि लॉकर मिळून ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही मोठी धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर व जळगाव एसीबीच्या पथकाने पार पाडली।

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४, व्हॉट्सअ‍ॅप ७५८८६६१०६४ किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे।

Comments

No comments yet.