मुंबई, (प्रतिनिधी), दि. २३ जानेवारी २०२६ - गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या बहुचर्चित 'महाराष्ट्र सदन' गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात दोघांनाही दोषमुक्त केले असून, या निकालावर प्रतिक्रिया देताना "हा सत्याचा आणि न्यायाचा विजय आहे," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
न्यायप्रक्रियेवर आमचा विश्वास होता - छगन भुजबळ
न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कायदेशीर लढाई लढत होतो. या संपूर्ण काळात आम्ही संयम राखला आणि न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवला. आज न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त करून आमच्यावरील आरोपांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा केवळ आमचा नाही, तर सत्याचा विजय आहे."
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, कठीण काळात कुटुंब, सहकारी आणि जनतेने जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. या निकालामुळे मिळालेल्या उर्जेतून आता अधिक जोमाने जनतेच्या सेवेसाठी काम करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
समीर भुजबळ यांच्याकडून न्यायालयाचे आभार
माजी खासदार समीर भुजबळ यांनीही या निकालाचे स्वागत केले आहे. "सत्य परेशान होऊ शकतं, पण पराजित नाही. आम्ही सुरुवातीपासूनच तपासात सहकार्य केले आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. आज अखेर आम्हाला न्याय मिळाला आहे," असे त्यांनी म्हटले.
काय होते प्रकरण?
मुंबईतील 'अंधेरी आरटीओ' आणि दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' या इमारतींच्या बांधकामात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भुजबळ कुटुंबीयांवर करण्यात आला होता. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तपास केला होता. मात्र, पुराव्याअभावी आणि कायदेशीर बाजू पडताळून पाहिल्यानंतर न्यायालयाने आज हा ऐतिहासिक निकाल दिला.
निर्दोष मुक्ततेनंतर भुजबळ पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने सक्रिय राजकारणात आणि जनसेवेत उतरणार असल्याचे बोलले जाते.