उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले.... निवडून आलेल्या या नगरसेवकाने साथ सोडली... कुणाच्या गळाला लागणार?

Share:
Main Image
Last updated: 21-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आल्यानंतर अवघ्या काही तासांतच चार नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असतानाच, आता मुंबई महापालिकेतही (BMC) ठाकरे गटाला पहिला मोठा धक्का बसला आहे. कुर्ला परिसरातील प्रभाग क्रमांक १५७ मधून विजयी झालेल्या डॉ. सरिता म्हस्के-शिंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सेना भवनातील बैठकीला दांडी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना भवनात नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के यांनी अनुपस्थिती लावल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असून त्या लवकरच अधिकृतपणे 'धनुष्यबाण' हाती घेण्याची शक्यता आहे.

भाजपच्या आशा तायडे यांचा केला होता पराभव डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग १५७ मधून भाजपच्या तगड्या उमेदवार आशा तायडे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत म्हस्के यांनी बाजी मारली होती. मात्र, विजयाचा गुलाल सुकण्यापूर्वीच त्यांनी ठाकरे गटापासून अंतर राखण्यास सुरुवात केल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

ठाकरे गटाचे संख्याबळ घटणार? मुंबईत ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. जर डॉ. सरिता म्हस्के यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला, तर ठाकरे गटाचे संख्याबळ ६४ वर येईल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आणि महापौरपदासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना, हा बदल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

अपात्रतेची टांगती तलवार? दरम्यान, म्हस्के यांच्या या संभाव्य बंडाची दखल ठाकरे गटाने घेतली असून, त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. "आम्ही सर्व नगरसेवकांशी संपर्कात आहोत, कोठेही फूट पडणार नाही," असा दावा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केला जात असला तरी, म्हस्के यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.